अनेक जण सुरक्षेच्या कारणास्तव महागड्या कार खरेदी करतात; जेणेकरून आपली कार आणि कारमधील सामान सुरक्षित राहील. पण, सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर अनेकांना या महागड्या कार तरी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडला आहे. हो! कारण- बंगळुरूमधील एका महागड्या कारमधून चोरट्यांनी तब्बल १३ लाखांची रक्कम चोरून नेल्याच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चोरट्यांनी या कारमधील पैशांची चोरी अतिशय बिनधास्तपणे केल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांना कोणाचीही भीती वाटत नसल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. तसेच या चोरट्यांनी भरदिवसा महागड्या बीएमडब्ल्यू कारमधील चोरी केल्याचा संशयदेखील त्यांच्या आसपास असणाऱ्या लोकांना आला नाही याबाबत अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत. चोरट्यांनी बीएमडब्ल्यू कारच्या काचा फोडून, त्यातील पैसे पळवून नेल्याची घटना त्या परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बीएमडब्ल्यू कारची काच फोडून केली चोरी

मिळालेल्या माहितीनुसार- बंगळुरूच्या शारजापूर भागात उपनिबंधक कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू कारमधील १३ लाखांची रोकड काही चोरट्यांनी पळवली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडल्याचे सांगण्यात येत आहे; तर उपनिबंधक कार्यालयाबाहेर बीएमडब्ल्यू कार उभी असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. या व्हिडीओत एक तरुण बाइकवर बसल्याचे दिसत आहे; तर दुसरा तरुण आजूबाजूला कोणी आहे का पाहून थेट कारची काच फोडतो. यावेळी तो कारमध्ये शिरून आतील पैशाची बॅग बाहेर काढतो आणि त्याच्या सहकाऱ्याच्या बाइकवर बसून, तेथून दोघेही भरधाव वेगाने पळून गेल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा- २५ वर्षे घरी बसून ‘या’ व्यक्तीला दर महिन्याला ५.६ लाख रुपये मिळणार, संपूर्ण प्रकरण वाचून थक्कच व्हाल

पोलिसांकडून तपास सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरट्यांनी चक्क बीएमडब्ल्यूची काच फोडून पैसे चोरल्याच्या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चोरट्यांचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच वेळी ही चोरी ओळखीच्या कोणीतरी केली असावी; ज्याला कारमध्ये १३ लाख रुपये ठेवल्याची माहिती होती, असाही अंदाज वर्तवला जात आहे.