रविवारी २ ऑक्टोबरला स्पेनमध्ये देशातील सर्वांत मोठ्या मानवी टॉवरचे म्हणजेच दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी तब्बल ११ हजार लोकांनी तारागोना शहरात गर्दी केली होती. २०१० साली युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत ‘कॅस्टेल्स’ म्हणजेच या मानवी मनोरे रचण्याच्या खेळाचा समावेश करण्यात आला.

अठराव्या शतकात पहिल्यांदाच वॉल्समधील कॅटलान या शहरात लोकांनी मानवी मनोरे रचण्याच्या खेळास सुरुवात केली. तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे. दर दोन वर्षांनी तारागोना येथे या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावेळी ‘कॅस्टेलर्स’चे संघ एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून सर्वांत उंच आणि सर्वांत क्लिष्ट मानवी मनोरे रचण्याची स्पर्धा करतात. यंदा विलाफ्रँका या संघाने इतर ४० संघांना हरवून या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि १६ हजार युरो म्हणजेच जवळपास १३ लाख रुपयांचं बक्षीस मिळवलं.

विलाफ्रँका संघाने ४३ फूट उंच १० थरांचा मानवी मनोरा रचला होता. उंची, कौशल्य आणि सुरक्षित उतरणी या निकषांवर परीक्षकांनी या संघाला सर्वाधिक गुण दिले. या संघातील सर्वांत लहान सदस्याने हेल्मेट घालून अतिशय चपळतेने आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीवर आणि खांद्यावर चढून मनोऱ्याचे टोक गाठले.

सेबॅलट्स संघाच्या मुलांच्या पथकाचे प्रमुख, ३० वर्षीय क्रीडा मानसशास्त्रज्ञ जॉर्डंड यांनी रॉयटर्सला सांगितले की, “मुलांशिवाय कोणतेही कॅस्टेल नसतील. मनोऱ्याच्या टोकावर पोहोचणाऱ्या मुलांना आपल्या सहकाऱ्यांशी समन्वय साधावा लागतो, आणि हे अतिशय महत्त्वाचे आहे.”

दरम्यान, या थरारक स्पर्धेत काही मनोरे डळमळत होते आणि मनोऱ्यातील सदस्य खाली असलेल्या सदस्यांवर पडत होते. आयोजकांनी सांगितले की या स्पर्धेत ७१ जणांना वैद्यकीय मदत देण्यात आली असून १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या १३ वर्षांपासून तारागोना संघातून खेळणाऱ्या ३९ वर्षीय जुआन मॅन्युएल रॉड्रिग्जने सांगितले की, आम्ही साधारणपणे आठवड्यातून दोन वेळा सराव करतो. मात्र हा एक असा सामाजिक खेळ आहे जो सराव करणे आणि मनोरे रचणे यांच्याही पलीकडे आहे. तारागोना बुल रिंगमधील पहिली कॅस्टेल्स स्पर्धा १९३२ मध्ये झाली. यानंतर १९७० पासून ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित केली जात आहे.