Ola Showroom Fire : कर्नाटकातील कलबुर्गीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ग्राहकाने थेट ओला इलेक्ट्रिक शोरूमला आग लावली आहे. मोहम्मद नदीम असं या ग्राहकाचे नाव आहे. नदीमने अनेक वेळा शोरूममध्ये जाऊन ओला इलेक्ट्रिक स्कूटरमधील समस्येबाबत तक्रार केली, परंतु त्याच्या कोणत्याही समस्येचे योग्य निराकरण संबंधित दुकानदाराने न केल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे.

सहा दुचाकी दिल्या पेटवून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीमने मंगळवारी शोरूममध्ये पेट्रोल घेऊन प्रवेश केला आणि सहा बाईक पेटवून दिल्या. काही वेळातच आग संपूर्ण शोरूममध्ये पसरली. यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत नदीमला अटक केली आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नदीमने ऑगस्टमध्ये या शोरूममधून ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. ज्यासाठी त्याने 1.4 लाख रुपये खर्च केले होते. मात्र, काही दिवसांनी स्कूटरच्या बॅटरी आणि साउंड सिस्टिममध्ये तांत्रिक समस्या निर्माण होऊ लागल्या.  यावेळी त्याने शोरूमच्या कर्मचाऱ्यांशी अनेकदा संपर्क साधला, परंतु त्यांनी त्याच्या समस्येकडे सतत दुर्लक्ष केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “शोरूमला अनेकदा भेट देऊनही, आपल्या नवीन स्कूटरशी संबंधित समस्या सोडवण्यास कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे नदीम संतापला होता. यानंतर पुन्हा एकदा शोरूममध्ये जाऊन तो कर्मचाऱ्यांशी बोलला. यावेळी शोरूम कर्मचाऱ्यांबरोबर त्याचे जोरदार वादविवाद झाले. यानंतर चिडलेल्या नदीमने रागाच्या भरात शोरूमला आग लावली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.