संस्कृती, भाषा, रंग आणि भौगोलिक परिस्थिती हे घटक वेगळे असले तरी अन्न हा एकच असा धागा आहे, जो जगभरातील लोकांना एका क्षणात जोडून टाकतो. भारतीय संस्कृतीत तर ‘अतिथी देवो भवः’ ही संकल्पनाच रक्तात मुरलेली. म्हणूनच कोणाला खायला घालणं हे इथे केवळ कर्तव्य नसून, आनंद आणि आशीर्वाद देण्याची एक पवित्र पद्धत मानली जाते. भारतीय संस्कृतीचं असंच एक उदाहरण ऑस्ट्रेलियात पाहायला मिळालं आणि तो देखणा क्षण आता संपूर्ण जगाच्या मनाला स्पर्श करीत आहे.

बेरी स्प्रिंग्स नेचर पार्कमध्ये एक सिंगल मदर असलेली ‘ईवा’ तिची मुलगी ‘गाया’सोबत फेरफटका मारत होती. फेरफटका मारत असताना त्यांनी काही क्षणांतच असे काही घडले ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. बागेत फिरताना गायानं अचानक आईचा हात सोडला आणि ती थेट जवळच पिकनिकला आलेल्या एका भारतीय कुटुंबाकडे धाव घेतली. जणू ती आधीपासूनच त्या कुटुंबाचा भाग असावी, अशा सहजतेनं ती त्यांच्या चटईवर जाऊन बसली आणि प्लेटमध्ये जेवण मागू लागली.

तिची आई थोडी गोंधळली होती; पण भारतीय कुटुंबानं मात्र हसतमुखानं त्या चिमुरडीचं स्वागत केलं. “कोणीही आलं तरी आधी जेवण!” हे भारतीय प्रेम आतिथ्याचं दर्शन घडविणारं दृश्य त्या परदेशी भूमीतही दिसलं.

पाहा व्हिडिओ

ईवानं हा हृदयस्पर्शी क्षण कॅमेऱ्यात टिपून इन्स्टाग्रामवर शेअर करीत लिहिलं – “एक मिनीटापूर्वी आम्ही चालत होतो अन् पुढच्या मिनिटाला माझी मुलगी नवीन भारतीय मित्रांसोबत मेजवानी एन्जॉय करीत होती!” त्या छोट्याशा व्हिडीओनं अवघ्या काही दिवसांत जवळपास ८० लाख लोकांची मनं जिंकली आहेत.

लोकांनी भारतीय संस्कृतीच्या उदारतेचं कौतुक करीत अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ते तिला आधी पोटभर खाऊ घालतील आणि नंतर घरी न्यायला डब्यातही देतील,” असं एका युजरनं लिहिलं. दुसऱ्यानं अभिमानानं म्हटले की, “भारतीय विशेषतः हिंदू समारंभांमध्ये ‘बिन बुलाये’ (आमंत्रणाशिवाय) असं काही नसतं; जेवण सर्वांचे दार नेहमीच उघडं असतं.” आणखी एकानं तर भारतीय प्रेमाची व्याख्याच लिहिली – “’तुम्ही जेवलात का?’ नाही? मग हे घ्या व खा! आणि हे नंतर भूक लागली तर हे देखील घ्या!” हा छोटासा व्हिडीओ फक्त गोंडस नाही, तर तो आपल्याला आठवण करून देतो की, जगात कितीही भिंती उभ्या राहोत, प्रेमाचं दार नेहमीच उघडं ठेवणारं राष्ट्र आपण आहोत— आणि ती किल्ली आहे “जेवणाचे एक ताट”.