Dadar viral video: यंदा पावसाने पाच महिने धूमशान घातल्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हे सण मोठ्या धुमधडाक्यात लोकांना साजरे करता आले नाहीत. त्यामुळे आता पावसाने काढता पाय घेतल्यानंतर आलेला दिवाळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी मुंबईकरांनी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती.अशातच मुंबईतील दादरमध्ये तर एरवीही गर्दी असतेच मात्र आता दिवाळीनिमित्त घडलेला प्रकार पाहून तुम्हालाही धडकी भरेल. दादर मार्केंटमधला व्हिडीओही सध्या समोर आला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही दादरला खरेदीसाठी जाताना शंभर वेळा विचार कराल एवढं नक्की.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दिवाळीच्या आधी दादर मार्केटमध्ये प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होते. एवढी गर्दी आहे की जरा जरी तोल गेला तर सर्वजण एकमेकांच्या अंगावर पडू शकतात आणि मोठी चेंगराचेंगरी होऊ शकते. यामुळे लोकांचे जीवही जाण्याची शक्यता आहे. खरेदीदारांनी गजबजलेल्या अरुंद गल्ल्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, दरवर्षी गर्दीची समस्या असूनही स्थानिक लोक गर्दी व्यवस्थापनाच्या कमकुवत व्यवस्थापनावर टीका करत आहेत.

अनेकजण कार्यालयातून सुटी झाल्यानंतर थेट खरेदीसाठी बाजारपेठ गाठत असल्याने सायंकाळी याठिकाणी प्रचंड गर्दी निर्माण होते. रविवारी देखील दादर मार्केटमध्ये जीवघेणी गर्दी झाल्याचे दिसून आले होते. दरम्यान, गर्दीमुळे दररोज तेथील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्ता गाठण्यासाठी केवळ ३ ते ४ मिनिटे लागतात. मात्र, सद्यस्थितीत गर्दीतून वाट काढून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी नागरिकांना १० ते १५ मिनिटे लागत आहेत.

पाहा व्हिडीओ

बाजारपेठेत होत असलेल्या गर्दीतून मार्ग काढताना वृद्ध, अपंग तसेच, महिलांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दादर रेल्वे स्थानकाबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असल्याने ग्राहकांचीही संख्या वाढत आहे. महानगरपालिकेने गेल्या काही महिन्यांपूर्वी दादरमधील फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी पालिकेच्या कडक कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांनी विविध मार्ग अवलंबून व्यवसाय सुरू केले. त्यानंतर महानगरपालिकेची कारवाईही थंडावली. परिणामी, दादरमधील बाजारपेठेत पुन्हा ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.