Air France Passenger: पॅरिस ते टोरँटो विमान प्रवासाच्या दरम्यान एका प्रवाशाच्या सीटखाली एक अशी गोष्ट आढळून आली की ज्यामुळे प्रवाशांसह केबिन क्रू सुद्धा थक्क झाले होते. हा भयानक प्रकार हबीब बत्ताह नामक एका पत्रकाराने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. बत्ताह यांनी सांगितल्याप्रमाणे, विमान उड्डाणानंतर त्यांना एक तासाहून अधिक वेळ कसला तरी घाणेरडा वास येत होता, सुरुवातीला त्यांना हा दुर्गंध कशाचा आहे हे लक्षात आले नाही. काहीवेळाने त्यांनी न राहवून आजूबाजूला पाहायला सुरुवात केल्यावर त्यांना सिटखालील कार्पेटवर एक मोठा काळा डाग दिसून आला. त्यांनी स्पर्श करून पाहिल्यावर हा डाग थोडा ओलसर जाणवला.

ही काय बाब आहे लक्षात न आल्याने त्यांनी केबिन क्रू ला बोलावून घेतले आणि हा डाग साफ करण्यास सांगितला. त्यातील एका कर्मचाऱ्याने डाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करताच डाग रक्तासारखा लाल दिसू लागला . इतकंच नाही तेवढ्यात बत्ताह यांनी आपली बॅग उचलली असता ती सुद्धा रक्ताने माखली होती. हेच रक्ताचे डाग बत्ताह यांच्या हाताला व गुडघ्याला सुद्धा लागले होते. यानंतर केबिन क्रूकडून सांगण्यात आले की याआधीच्या एका प्रवासात एका प्रवाशाला ब्लीडींग झाले होते आणि त्याचाच हा डाग असावा.

दरम्यान, हबीब बत्ताह यांनी ट्वीट करत याघटनेविषयी माहिती देताना एअर फ्रान्सच्या कामाच्या पद्धतीवरही ताशेरे ओढले आहेत, ते म्हणतात की, “मी हाच विचार करतोय की इतकं ब्लीडींग होण्यासाठी नेमकं कारण तरी काय होतं? एका स्टाफ मेम्बरने सांगितल्याप्रमाणे हे कुठल्यातरी अंतर्गत जखमेमुळे झालेले ब्लीडींग होते म्हणजे जर यामुळे त्याला काही संसर्ग झाला असेल तर तो आता मलाही होण्याची शक्यता टाळता येत नाही”

हे ही वाचा<< तिरंग्यावर गाड्या चालवत बनवला Video; केरळचं नाव घेत व्हायरल झालेल्या क्लिपचं संतापजनक सत्य वाचा

या ट्वीटनंतर अनेकांनी कमेंट करून हबीब यांना समर्थन दर्शवले आहे. शिवाय विमान उड्डणांच्या आधी स्टाफ तर्फे विमानाची स्वच्छता करायलाच हवी होती असे न केल्याने तुम्ही अन्य प्रवाशांच्या जीवाशी खेळात आहात असेही काहींनी कमेंटमध्ये लिहिले आहे.