Kids Help Depressed Dog :नैराश्य (Depression) ही केवळ भावनिक कमकुवतता नसून — ती एक मानसिक आरोग्याची गंभीर अवस्था आहे, जिथे मन, शरीर आणि वर्तन या तिन्ही गोष्टींवर परिणाम होतो. मनोवैज्ञानिकांच्या मते, नैराश्य म्हणजे सतत उदास राहणं, स्वतःबद्दल नकारात्मक विचार येणं आणि आयुष्य जगण्याचा उत्साह संपतो. या काळात व्यक्ती (किंवा प्राणी) बाहेरून शांत दिसत असतो, पण आतून खोल दु:ख, हरवलेपण आणि अपराधीपणा अनुभवत असतो. नैराश्य म्हणजे फक्त माणसांनाच होणारा आजार असं नाही. ही अवस्था प्राण्यांनाही त्रास देते. माणसाप्रमाणेच तेही आतून तुटतात, दु:खी होतात.

मानसशास्त्रात असे मानले जाते की,”एखादे भावनिक बंध तुटल्यावर – जसे की प्रिय व्यक्ती, साथीदार किंवा मुलं गमावल्यानंतर मेंदूमध्ये ताण हार्मोन्स (Cortisol) वाढतात, ज्यामुळे नैराश्य वाढतं. हेच प्राण्यांमध्येही दिसून येतं. आपल्या पिल्लांना गमावल्यामुळे एका श्वानाला नैराश्य आले होते. त्याची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.

आपल्या पिल्लांना गमवालेल्या नैराश्यात असलेल्या श्वानाला पुन्हा आयुष्य जगण्याची उमेद मिळावी आणि आनंद मिळावी यासाठी मुलांच्या शाळेत ठेवण्यात आलं आणि तिथे त्याचं आयुष्यच बदललं.

मुलांच्या सहवासात उमलला श्वानाचा आनंद

श्वान हा प्राण्यांमध्ये सर्वात निष्ठावान, भावनाशील म्हणून ओळखला जातो. आपल्या लेकरांना गमावण्याचं दु:ख त्याच्यासाठीही असह्य होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की,”हा श्वान शाळेतील मुलांसह बसलेला आहे. तो एका मुलाच्या हातात आपला पंजा ठेवतो आणि शांतपणे त्याच्याकडे पाहतो, जणू काही त्याला त्या निरागसतेत पुन्हा जिवंतपणा सापडला आहे.”

चार तासांत साडेसात लाखांहून अधिक व्ह्यूज

हा भावनिक व्हिडिओ इंस्टाग्रामवर @trolls_official या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या चार तासांत साडेसात लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला, तर ऐंशी हजारांहून अधिक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. अनेकांनी लिहिलं — “मनाला भिडणारा व्हिडिओ आहे!”, “डोळ्यात पाणी आलं…”

हा व्हिडिओ फक्त एका श्वानाची गोष्ट नाही, तर माणुसकी आणि संवेदनेचं जिवंत उदाहरण आहे. कारण कधी कधी माणूस असो वा प्राणी — फक्त थोडी माया आणि साथ मिळाली, तरी दुखावलेले मन हळूहळू बरे होऊ लागतं.