Elephant Shocking Video Viral : सोशल मीडियावर वन्यप्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ फार हसवणारे असतात तर काही फार धक्कादायक असतात. ज्यातून अनेकदा प्राण्यांचे रौद्र रुप पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एका भल्यामोठ्या हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात जंगलात नदीकाठी पिकनिकचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना हा हत्ती कशाप्रकारे घाबरवतो ते दिसतेय.
बरेचजण कुटुंबासह पिकनिकसाठी निसर्गरम्य ठिकाणी जाणं पसंत करतात. पण अशा ठिकाणी अनेकदा वन्य प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर असणाऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे स्वत:हून स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे, अशाचप्रकारे काही पर्यटकांनी पिकनिकसाठी जंगलातील एक जागा निवडली, जिथे नदीकाठी बसून ते पिकनिकचा आनंद घेत होते. पण याचवेळी एक पिसाळलेला हत्ती तिथे येतो आणि सर्व पर्यटक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागतात.
व्हिडीओत पाहू शकता की, एक कुटुंब पिकनिकसाठी गाडी करुन जंगलातील एका शांत ठिकाणी पोहोचलयं. तिथे जवळच एक नदी देखील आहे, जिच्या किनाऱ्यावर त्यांनी जेवण बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य अर्थात पाण्याच्या बाटल्यांपासून गॅस सिलिंडर, कांदे असं साहित्य ठेवलंय. तर तिथेच चटई अंथरून त्यावर आपल्या बॅग्स वैगरे ठेवल्यात. यावेळी ते पर्यटक नदी काठी पाण्यात भिजण्याचा तर काही फिरण्याचा आनंद घेत होते. पण तेव्हा जंगलातून अचानक एक पिसाळलेला भलामोठा हत्ती धावत येतो. लोकांना पाहताच तो मोठ्याने आवाज करत पळू लागतो. हत्तीचे हे रुप पाहून पर्यटक घाबरतात आणि तेही जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. यामुळे तिथे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण होते.
पिसाळलेल्या हत्तीला पाहताच नदीत कार घेऊन गेलेला चालकही आपला मार्ग बदलू लागतो. पण सुदैवाने हत्ती कोणालाही दुखापत न करता नदीतून पुढे जंगलात निघून जातो. पण हत्तीचे हे रुप पाहून पर्यटक चांगले बिथरतात.
या घटनेचा व्हिडीओ आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान @ParveenKaswan यांनी शेअर केला आहे, जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमधून लोकांना वन्यजीवांचे अधिवास असलेली ठिकाणं पिकनिट स्पॉट म्हणून निवडणं किती धोक्याचं ठरु शकते हे सांगितले आहे. त्यांनी लिहिले की, ”मला सांगा यात चूक कोणाची, पिकनिकसाठी अशी जागा का निवडावी जिथे हत्तींचा सहसा वावर असतो? पिकनिकसाठी सुंदर ठिकाणांच्या शोधात कृपया जीव धोक्यात घालू नका,”
या घटनेवर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, वनअधिकाऱ्यांनी अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत. तर काहींचे म्हणणे आहे की, खरी चूक जंगलात पिकनिकसाठी जाणाऱ्या लोकांची आहे.
एका युजरने लिहिले की, ‘सरकारने अशा ठिकाणी जाण्यावर बंदी घालावी.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘हे ठिकाण हत्तींचे घर आहे. जर माणूस तिथे आला तर हत्ती नक्कीच भडकतील’ शेवटी एकाने लिहिले की, ‘वन विभागाने याचा विचार करावा.