रशिया युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. रशियातील अनेक उद्योग बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे रशियाने काही उत्पादनांची निर्यात बंद केली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक देशांनी युक्रेनला समर्थन देत रशियाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही देशांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती एलोन मस्क यांचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे. एलोन मस्क यांनी पुतिन यांना आखाड्यात दोन हात करण्याचं आव्हान दिलं आहे. त्याचबरोबर जो जिंकेल त्याचं युक्रेन असं देखील सांगितलं आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना कुस्तीसाठी आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. एलोन मस्क यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, “मी व्लादिमीर पुतिन यांना कुस्तीचं आव्हान देतो. यासाठी युक्रेनचा डाव असेल.” या ट्विटची खास गोष्ट म्हणजे त्यांनी पुतिन यांचे नाव रशियन भाषेत तर युक्रेनचे नाव युक्रेनियन भाषेत लिहिले आहे. मस्क उघडपणे रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनची बाजू घेत आहेत. अलीकडे, युद्धाच्या ठिकाणी युक्रेनला एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सकडून स्टारलिंक उपग्रह इंटरनेट टर्मिनल्स मिळाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी युद्धानंतर एलोन मस्क यांना युक्रेनमध्ये येण्याचं निमंत्रण दिले आहे. झेलेन्स्कीच्या इन्स्टाग्रामवर दोघांमधील भेटीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. झेलेन्स्की यांनी ट्विटरवर पोस्ट केले, “मी एलोन मस्क यांच्याशी बोललो. युक्रेनला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पुढील आठवड्यात आम्हाला नष्ट झालेल्या शहरांसाठी स्टारलिंक प्रणालीची आणखी एक तुकडी प्राप्त होईल. संभाव्य अवकाश प्रकल्पांवर चर्चा झाली. मी त्याबद्दल युद्धानंतर बोलेन.”