एखाद्याने दारू पिऊन भर रस्त्यात धिंगाणा घातला किंवा दारू पिऊन मारहाण केली, अशा घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण गेल्या दोन दिवसापासून मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीची चांगलीच चर्चा आहे. दारू प्यायल्यानंतर नशा न झाल्यानं या पठ्ठ्यानं थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना तक्रार केली. महत्वाचं म्हणजे त्याच्या तक्रारीची दखल घेतली गेली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जाणून घेऊयात नेमकं काय घडलंय.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीने दारू प्यायल्यानंतर नशा न झाल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना पत्र लिहून दारू बनावट आणि भेसळ असल्याचा संशय व्यक्त केला. त्या दुकानातून भेसळयुक्त दारू विकली जात होती, असा आरोप या व्यक्तीनं केलाय. त्याच्या या तक्रारीनंतर येथील उत्पादन शुल्क आयुक्तांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून त्यानुसार कारवाई करण्यास सांगितले आहे.

उज्जैनच्या बहादूरगंज भागातील रहिवासी लोकेश सोठिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी १२ एप्रिल रोजी येथील एका दुकानातून देशी दारूच्या चार सीलबंद बाटल्या खरेदी केल्या होत्या. ‘मी आणि माझा मित्र त्यापैकी दोन बाटल्या (प्रत्येकी १८० मिली) प्यायलो, पण मला नशा वाटली नाही. त्यामुळे बाटल्यांमध्ये अल्कोहोलमिश्रित पाणी असल्याचा दावा त्यांनी केला.’

सोठिया म्हणाले, ‘मी अजून दोन बाटल्यांचे सील उघडलेले नाही आणि गरज पडल्यास त्या बाटल्या मी पुरावे म्हणून सादर करेन. खाद्यपदार्थ, तेल आणि इतर गोष्टींमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र आता दारूमध्येही भेसळ होत आहे. हे योग्य नाही. मी ग्राहक मंचात जाईन. गेल्या दोन दशकांपासून आपण दारूचे सेवन करत असून त्याची चव आणि दर्जा आपल्याला चांगलाच माहित आहे,’ असं सोठिया यांनी म्हटलंय.

सोठिया यांचे वकील नरेंद्र सिंह धाकडे म्हणाले की, लोकेश सोठियासोबत झालेल्या फसवणुकीचे प्रकरण आम्ही ग्राहक मंचाकडे नेत आहोत. ‘माझ्या क्लायंटचा ‘पेड पार्किंग’चा व्यवसाय आहे. तो अनेक वर्षांपासून दारू पितो, त्यामुळे त्याला भेसळयुक्त आणि अस्सल दारूची ओळख आहे.’

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.