आत्तापर्यंत आपण पाण्यात पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी केलेली अनेक ऑपरेशन्स पाहिली आहेत. पण पंखाजूरच्या परळकोट धरणात पहिल्यांदाच एका मोबाईलसाठी तब्बल चार दिवस सर्च ऑपरेशन केल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईल शोधण्यासाठी या धरणातून लाखो लिटर पाणी वाया घालवण्यात आलं आहे. त्यामुळे या घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. धरणात पडलेला मोबाईल बाहेर काढण्यासाठी सोमवारपासून ‘सर्च मोबाईल’ ऑपरेशन सुरू करण्यात आले होते, जे गुरुवारी मोबाईल बाहेर काढल्यानंतर संपले.

मिळालेल्या माहितीनुसार, पंखाजूरचे रहिवासी असलेले आणि सध्या पंखाजूरमध्येच अन्न निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश विश्वास हे आपल्या मित्रांसह परळकोट धरणावर पार्टी करण्यासाठी गेले होते. या पार्टीदरम्यान त्यांचा दीड लाख किंमतीचा मोबाईल धरणातील पाण्यात पडला. मोबाईल पाण्यात पडताच अधिकारी राजेश विश्वास अस्वस्थ झाले.

हेही पाहा- रस्त्यावर आंबे विकण्यासाठी लहान मुलाने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

सोमवारी सकाळी त्यांनी आसपासच्या काही दुकानदारांसह गोताखोरांना आपल्याबरोबर घेतलं आणि धरणात पडलेला मोबाईल शोधण्यासाठीचं ‘सर्च मोबाइल’ ऑपरेशन सुरू केलं. पण गोताखोरांना पाण्यात पडलेला मोबाईल बाहेर काढण्यात यश न आल्याने धरणातील पाणी काढण्यासाठी थेट पंप बसवले आणि या पंपांमधून तीन दिवस पाण्याचा उपसा करण्यात आला. लाखो लिटर पाण्याचा उपसा केल्यानंतर मोबाईल सापडला पण तो देखील खराब झालेला आहे.

हेही वाचा- रोजंदारी करणारा मजूर एका रात्रीत १०० कोटींचा मालक बनला तरी कसा? आता मागे लागला पोलिसांचा ससेमिरा कारण…

मात्र, या कालावधीत सुमारे २१ लाख लिटर पाणी वाया गेले. जेवढे पाणी वाया गेले, त्याचा वापर एक हजार एकर शेती ओलिताखाली आणता आली असती. त्यामुळे या परिसरातील शेकडो शेतकरी चिंतेत आहेत. विशेष म्हणजे पखांजूरमध्ये तैनात असलेले अन्न निरीक्षक राजेश विश्वास हे स्थानिक असले तरी त्यांच्या कारनाम्यांमुळे ते नेहमीच वादात आणि चर्चेत राहिले आहेत. स्वत:च्या रेशनकार्डच्या तांदळात गडबड केल्याप्रकरणी त्यांना एकदा निलंबितही करण्यात आले होते. आता महागड्या फोनचे चार दिवस सर्च ऑपरेशन केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्न निरीक्षकांकडून ही कारवाई सुरू असताना सलग चार दिवस धरणातून पाणी काढण्यावरून वाद सुरू होता. तक्रारीनंतर जलसंपदा विभागाचे एसडीओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाणी काढण्याचे काम थांबवले. मात्र तोपर्यंत २१ लाख लिटर पाणी वाया गेले होते. या प्रकरणी आता छत्तीसगडच्या माजी मुख्यमंत्र्यांनीही ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली असून संबंधित अधिकाऱ्याला त्याच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे.