little girl funny video: सोशल मीडियावर सध्या एका छोट्या मुलीचा मजेशीर व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी लहानशी गोड मुलगी फोटोसाठी पोज देत असताना तिच्यासोबत असा काहीतरी मजेदार किस्सा घडतो की पाहणारेही हसू आवरू शकत नाहीत. लहान मुलांच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि त्यांच्या भोळेपणामुळे कधी कधी मोठ्यांना थोडी मस्ती करायची संधी मिळते आणि हाच किस्सा या व्हिडीओत दिसतो.

हा व्हायरल व्हिडीओ एका मजेदार प्रॅंकवर आधारित आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगी एका छोट्या मुलीचे फोटो काढत असते. ती त्या छोट्या मुलीला वेगवेगळे पोज देण्यास सांगते आणि ती आनंदाने एकापेक्षा एक सुंदर पोज देते. या सगळ्यात ती छोटी मुलगी अगदी आनंदात असते, कारण तिला वाटत असते की तिचे सुंदर फोटो क्लिक होत आहेत. पण, त्याचवेळी फोटो काढणारी मुलगी थोडी खोडी काढते. ती मोबाईलचा टॉर्च ऑन करते आणि फोटो घेत असल्याचे भासवते. प्रकाश पाहून ती छोटी मुलगी खूश होते आणि उत्सुकतेने फोटो पाहण्यासाठी धाव घेते.

पण, पुढे जे घडते ते अगदी अनपेक्षित असते! फोटो दाखवण्याच्या बहाण्याने ती मुलगी मोबाईलवर एका माकडाचा फोटो दाखवते; त्याला पाहून तिचे डोळे विस्फारले आणि ती अक्षरशः श्वास रोखून बसली. क्षणभरासाठी तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे असतात. आधी धक्का, नंतर भीती आणि मग राग! ती ओरडते, उडी मारते आणि रागाने फोटो काढणाऱ्या मुलीकडे पाहते; तर दुसरीकडे प्रॅंक करणारी मुलगी जोरात हसत असते. तिच्या हसण्यावरूनच हे किती मजेदार क्षण होते ते लक्षात येते.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ ट्विटरवर @0nlyk1tt3n या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या छोट्याशा व्हिडीओला तब्बल १३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या प्रॅंकवर हसून हसून प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी या मुलीच्या निरागसतेवर प्रेम व्यक्त केले.

एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटलं “जोराचा झटका हळूच बसला!” तर दुसऱ्याने म्हटलं, “अगं बाई, या मुलीच्या निरागस भावनांशी खेळू नका!” आणखी एकाने लिहिले, “हे पाहून मला तो क्षण आठवला, जेव्हा आपलं हृदय क्षणभर थांबतं!” तर काहींनी हसत लिहिलं, “हेच तर म्हणतात विश्वासघात!”

या छोट्याशा प्रॅंक व्हिडीओने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. मुलीचा निरागस राग, तिची गोंडस प्रतिक्रिया आणि प्रॅंक करणाऱ्या मैत्रिणीचं हसू — हे सगळं पाहून सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत, “असं गोंडस प्रॅंक रोज दिसायला हवं!”