mumbai cricket fans celebrate: मुंबईचे क्रिकेटप्रेम पुन्हा एकदा जगासमोर झळकले आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्याने केवळ भारतीय संघाचा विजयच नव्हे, तर मुंबईच्या क्रिकेटप्रेमाची ताकदही दाखवून दिली. या सामन्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, “क्रिकेट म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे क्रिकेट!”
हा व्हिडीओ मुंबईत झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्याचा आहे, जिथे भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच महिला विश्वविजेतेपद पटकावले. मात्र, या सामन्याचा खरा नायक ठरला तो मुंबईकरांचा उत्साह आणि त्यांचा खेळाप्रतीचा आदर.
व्हिडीओत डी. वाय. पाटील स्टेडियममधील विद्युत वातावरण दिसते. प्रेक्षकांच्या घोषणांनी संपूर्ण स्टेडियम दुमदुमलेले. भारत विजयाच्या उंबरठ्यावर असताना, डीजेने “देवा श्री गणेशा” हे गाणं वाजवलं आणि हजारो चाहत्यांनी एकसुरात ताल धरला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने शतक पूर्ण केल्यानंतर संपूर्ण मुंबईकरांनी तिला उभे राहून टाळ्या वाजवल्या. भारतीय संघ जिंकला, पण स्टेडियममध्ये क्रीडाभाव, आदर आणि आनंदाचा मिलाफ दिसला.
पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर मुंबईच्या क्रिकेट स्पिरीटचा जल्लोष पाहायला मिळतोय. एका युजरने लिहिलं, “२०२६ चा टी-२० विश्वचषक अंतिम सामना थेट वानखेडेवर ठेवावा, कारण क्रिकेटचा आत्मा इथेच आहे.” दुसऱ्याने म्हटलं, “२०११ आणि २०२५ — दोन्ही विश्वविजय मुंबईने पाहिले आहेत. पुढचे फायनल्सही इथेच व्हावेत.” तर आणखी एका चाहत्याने म्हटलं, “भारत विजयाच्या उंबरठ्यावर, डीजेवर ‘देवा श्री गणेशा’ आणि प्रेक्षकांचा एकसुरी जल्लोष हे सिनेमॅटिक क्षण आहेत.” अनेकांनी मुंबईच्या महिला क्रिकेटप्रेमाचेही कौतुक केले — “ते महिला क्रिकेटलाही तितक्याच जोशात पाहतात, संघ संघर्ष करत असतानाही त्यांनी पाठिंबा थांबवला नाही.”

वानखेडेपासून डी. वाय. पाटीलपर्यंत, मुंबई केवळ क्रिकेट सामने पाहत नाही तर ते जगते. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन आणि प्रत्येक जल्लोष या शहराच्या हृदयात धडधडतो, म्हणूनच नेटिझन्स म्हणतात —”आयसीसी फायनलचे आयोजन करण्यासाठी मुंबईपेक्षा चांगले ठिकाण नाही!” मुंबई क्रिकेटचा उत्सव साजरा करते आणि त्या उत्सवाचा प्रत्येक क्षण इतिहास बनतो.
