आजकाल रस्ते अपघातांच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. या अपघातांमुळे लोकांच्या मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे मोठे अपघात होतात, ज्यामध्ये अनेकांना लोकांना जीव गमवावा लागतो. तर अनेकदा लांबच्या प्रवासामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना आपोआप झोप येते, जी मोठ्या अपघातास कारणीभूत ठरु शकते. हाच धोका लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील इंदौर येथील काही विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम असे उपकरण बनवले आहे. जे वाहन चालवताना ड्रायव्हरला जागे करण्याचे काम करणार आहे.
वाहन आपोआप थांबणार –
वाहन चालकांची अपुरी झोपेमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी इंदौर येथील काही विद्यार्थ्यांनी ‘अँटी स्लीप अलार्म’ बनवला आहे. जो ड्रायव्हर गाडी चालवताना झोपू लागताच वाजायला सुरुवात होईल. अँटी स्लीप अलार्म बनविणाऱ्यांपैकी एका विद्यार्थ्याने सांगितले की, या अलार्ममध्ये अँटी स्लीप ग्लास लावण्यात आली आहे. त्यामुळे ड्रायव्हर गाडी चालवताना झोपू लागताच, अलार्म वाजायला सुरुवात होईल, तरीही ड्रायव्हरला जागा आली नाही तर गाडीची चाके आपोआप थांबतील.
५ विद्यार्थ्यांनी मिळून बनवला अलार्म –
सध्या या अँटी स्लीप अलार्मचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो ANI ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा अलार्म बनविणाऱ्या मुलांनी सांगितलं की, ड्रायव्हरचे डोळे बंद झाल्यानंतर तो अलार्म वाजायला सुरुवात होईल. अलार्म वाजल्यानंतरही ड्रायव्हर जागा झाला नाही तर वाहनाची चाके आपोआप थांबतील. हा अलार्म बनविण्याची प्रेरणा होशंगाबाद जिल्ह्य़ातील बस अपघातानंतर मिळाल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलं. तर हा अलार्म बनवण्यासाठी ३ आठवड्यांचा वेळ लागला आणि ५ जणांनी मिळून बनवल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान या मुलांनी तयार केलेल्या अलार्मचं नेटकरी तोंडभरुन कौतुक करत असल्याचं पाहायला मिळत आहे.