काम करण्याच्या ठिकाणी एखादा पुरूष जर धुम्रपानासाठी ‘ब्रेक’वर जात असेल तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत त्याला अधिक फायदा होतो. हे आम्ही म्हणत नाहीये… तर, ‘नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक’ने सोमवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आलीये.
या अहवालानुसार, जर तुमचा मॅनेजर अथवा बॉस पुरूष असेल आणि तो जर स्मोकिंग करत असेल तर बॉससोबत स्मोकिंगसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला धुम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत प्रमोशन मिळण्याची शक्यता अधिक बळावते. हा अहवाल एका सखोल अभ्यासाद्वारे करण्यात आला आहे. यानुसार, जर एखाद्या पुरुष कर्मचाऱ्याचा बॉसदेखील पुरूष असेल तर पुरुषांना अधिक फायदा मिळतो. तर, महिलांच्या प्रमोशनवर त्यांचा बॉस पुरूष आहे की महिला याचा परिणाम होत नाही. बॉस पुरुष अथवा महिला असली तरीही महिलांना बढती मिळण्याचं प्रमाण सारखंच राहतं.
हार्वर्ड बिजनेस स्कूलचे जो क्युलेन आणि यूसीएलए अँडरसन स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे रिकार्डो पेरेज यांनी हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल तयार करताना यापूर्वी केलेल्या रिसर्चचाही अभ्यास करण्यात आला. त्यानुसार इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत आपल्याला प्रमोशनमध्ये प्राधान्य दिले जावे, अशी इच्छा असलेले पुरूष आपल्या बॉसला स्पॉन्सर करताना दिसतात. शिवाय, आपल्यावर त्यांचा वरदहस्त कायम राहावा यासाठी हे प्रयत्नशील असतात असेही दिसून आले आहे. याशिवाय, अधिकारी पदांवर असलेल्या महिलांची संख्या मूळातच कमी असते, त्यामुळे जास्त फायदा पुरूषांनाच होतो, असेही आढळून आले आहे.