Kedarnath mule forced to smoke : उत्तराखंडमधील केदारनाथ धाम यात्रेला मे महिन्यापासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. तेथील अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जामची स्थिती पाहायला मिळाली. तरीही मोठ्या संख्येने भाविक केदारनाथाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. अशात या पवित्र यात्रेतील एक वेदनादायी व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय; जो पाहून आता युजर्स तीव्र शब्दांत संताप व्यक्त करीत आहेत. केदारनाथ यात्रेचा प्रवास भाविकांना आरामात करता यावा यासाठी घोडा किंवा खेचराचा वापर केला जातो. पण, इतके वजन वर केदारनाथ मंदिरापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्राण्यांवर किती अत्याचार केले जातात तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर हा व्हिडीओ पाहाच.

प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा; युजर्सची मागणी

सध्या सोशल मीडियावर केदारनाथमधील खेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका खेचराला जबरदस्तीने गांजा पाजला जात आहे. तीन लोक मिळून खेचराचे तोंड जबरदस्तीने धरून आहेत. त्यातील दोन जण खेचराचे तोंड घट्ट धरून आहेत; तर तिसरी एक व्यक्ती खेचराची एक नाकपुडी बंद करून, त्याला जबरदस्तीने गांजा ओढण्यास देतेय. यावेळी खेचराची सुटका करून घेण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, एक नाकपुडी बंद असल्याने खेचराला गांजा समोर धरलेल्या नाकपुडीतून नाइलाजाने श्वास घ्यावा लागतोय. अतिशय वेदानादायी असा हा व्हिडीओ आहे; जो गेल्या वर्षीचा असल्याचे व्हिडीओ शेअर केलेल्या युजर्सने म्हटले आहे.

उन्हाळ्यात १० रुपयांची लोकल ब्रँडची आइस्क्रीम आवडीने खाणाऱ्यांनो फॅक्टरीतील ‘हा’ VIDEO पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा विचार कराल

या अमानवी कृत्याचा व्हिडीओ @travelwithsamalvlogs नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो पाहिल्यानंतर अनेकांनी प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर, काहींनी केदारनाथमध्ये मोबाईलवर बंदी आहे; पण गांजावर कोणतीही बंदी नाही, असे म्हणत उत्तराखंड पोलीस आणि सरकारी यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत.

केदारनाथच्या पादचारी मार्गावर घोडे आणि खेचरचालकांकडून या प्राण्यांवर अमानवी अत्याचार केले जातात. या प्राण्यांनी न थकता, अधिक काळ काम करावे, जास्तीचे वजन उचलावे यासाठी त्यांना खुलेआमपणे गांजा पाजला जातो. कारण- गांजाच्या नशेत हे प्राणी अधिक वेळ चालतात आणि नशा उतरली की, जमिनीवर कोसळतात. अनेकदा प्रवासी सामानासह या प्राण्यांबरोबर खाली पडतात. पण, अशा परिस्थितीतही घोडे आणि खेचरांना काठीने मारहाण करीत पुन्हा जबरदस्तीने उभे करीत चालवले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षी घोडे आणि खेचरांवर अमानुष कृत्याच्या अनेक घटना समोर येत असतात; पण व्हायरल व्हिडीओनंतर अशा प्रकारच्या घटनेवर अनेक भाविक आणि प्राणीप्रेमी सोशल मीडियावर रोष व्यक्त करीत आहेत. तसेच त्यांच्याकडून अशा अमानवी घटना रोखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.