काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या ‘कल्चर मीडिया’ या मीडिया कंपनीने मासिक पाळीची रजा सुरू केली होती. या निर्णयावर पाऊल ठेवत केरळमधल्या ‘मातृभूमी’ या मीडिया कंपनीने देखील आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देणार असल्याचं जाहिर केलंय. या मीडिया ग्रुपमध्ये सध्या ७० महिला कर्मचारी काम करतात. ‘फक्त महिलांच्या सबलीकरणावर भाष्य करणं पुरेसं नाही तर महिलांच्या अडचणी समजून त्यांना साथ देणं देखील गरजेच आहे’ असं या मीडिया ग्रुपचे व्यवस्थापकिय संचालक श्रेयम कुमार यांनी सांगितलं. मातृभूमी चॅनेलमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वाचा : आईसाठी गेल्या २० वर्षांपासून ‘तो’ मुलगी होऊन जगतोय

मासिक पाळीच्या त्या पाच दिवसांत होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक त्रासातून प्रत्येक महिला जात असते. पाय, कंबर पोटात दुखणं, चालण्यास त्रास होणं, शारीरिक आणि मानसिक थकवा त्यामुळे होणारे मूड स्विंग्स अशा अनेक गोष्टींचा त्रास तिला होत असतो. असे विषय चारचौघांत सांगणंही अनेकींना सोयीचं वाटत नाही. त्यातून वर्किंग वूमनच्या बाबतीत ही समस्या तर अधिक गंभीर आहे. आपल्याला होणारा त्रास खुलेपणाने सांगता येत नाही तेव्हा मासिक पाळीच्या काळात महिला आजारी असल्याचे कारण सांगून कार्यालयात अनुपस्थित राहतात. तेव्हा ही समस्या समजून घेऊन मुंबईतल्या ‘कल्चर मीडिया’ने महिलांना मासिक पाळीची सुट्टी देऊ केली होती यापासूनच प्रेरणा घेऊन ‘मातृभूमी’ने हा निर्णय घेतला होता. मासिक पाळीच्या दिवसांत रजा देणारी ‘कल्चर मीडिया’ही भारतातील पहिलीच कंपनी होती. या कंपनीत ७५ महिला कर्मचारी काम करतात. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे एका पत्राद्वारे मासिक पाळीची सुट्टी प्रत्येक कार्यालयात लागू करावी, अशी मागणी केली होती.