Lalbaugcha Raja Visarjan Video: यावर्षी २७ ऑगस्टच्या गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरूवात झाली आहे. भारताबरोबरच परदेशातही गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पा घरोघरी, मंडळांमध्ये विराजमान झाले. १० दिवसानंतर आज अनंत चतुर्दशीनिमित्त राज्यभरात गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे.
गणेशोत्सवात मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव म्हणजे भक्तांसाठी पंढरीच. लाखो भाविक दरवर्षी ठीक ठिकाणाहून मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट द्यायला येतात. अशात मुंबईतील गणेशोत्सव म्हटलं की आपोआप लालबागच्या राजाचं नाव डोळ्यासमोर येतं. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागची गणेशमूर्ती सर्वत्र ओळखली जाते. याच लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणूकीची चर्चा सध्या सगळीकडे होतेय. लाखो भक्तांची गर्दी आणि अशात लालबागच्या राजाचं जल्लोषात विसर्जन हे काही नवीन नाही. यावर्षीही त्याच जल्लोषात राजाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरू आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लालबागचा राजा विसर्जन व्हिडीओ (Lalbaugcha Raja Visarjan Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, लालबागचा राजाच्या विसर्जनाची दुपारीच सुरूवात झाली असून मेन गेटवर बाप्पावर पुष्पवृष्टी होताना दिसत आहे. आपल्या भारताचा झेंडा फडकवत देशभक्तीपर गाणं लावून बाप्पाच्या विसर्जनाची सुरूवात झाली. लाखो भक्तगण या विसर्जनाच्या सोहळ्यात सामील झाल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @lalbaugcharaja च्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, सध्या तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसंच “विसर्जन सोहळा मुख्य प्रवेश द्वार पुष्पवृष्टी २०२५” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला काहीच वेळात १ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी” तर दुसऱ्यानं “ही शान कुणाची? लालबागच्या राजाची!” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “राजा आणि त्याची प्रजा”
