Lok Sabha Election 2024: सर्च इंजिन गूगल (Google) नेहमी एखादा खास दिवस असेल, तर शुभेच्छा देत डूडल तयार करतं आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतं. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आजपासून सुरू झालं आहे. आज २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गूगलनंही त्यांचं खास डूडल सादर केलं आहे आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
गूगलनं आज १९ एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी मतदान चिन्हासह एक विशेष डूडल जारी केलं आहे. डूडलमध्ये भारतातील लोकशाही निवडणूक प्रक्रियेचं प्रतीक असलेल्या शाईचं बोट चित्रित केलं गेलं आहे. या डूडलवर क्लिक करताच तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रमुख बातम्यांची यादी दिसेल.
पोस्ट नक्की बघा…
गूगलच्या होम पेजवर गेलात की, तुम्हाला गूगलच्या नावात भारतातील लोकशाही निवडणूक प्रक्रियेचं प्रतीक दिसेल. आजच्या गूगल डूडलमध्ये मतदान करताना एका हाताचं बोट दाखवलं आहे. इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या गूगलच्या स्पेलिंगमध्ये ओ (O) या अक्षराच्या जागी हाताच्या दुसऱ्या बोटावर शाई लावल्याचं दाखविलं आहे. म्हणजेच गूगलनं त्यांच्या आयकॉनिक लोगोमध्ये थोडासा बदल करून, मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
तुम्हीदेखील तुमच्या स्क्रीनवर गूगल ॲप चालू केल्यास आज तुम्हाला गूगलचं रूप बदललेलं दिसेल. तसेच गूगलनं त्यांच्या अधिकृत @GoogleIndia या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट शेअर करीत या खास डूडलबद्दल थोडक्यात लिहिलं आहे. ‘मतदान करण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती एका क्लिकवर पाहा. ‘मत कसे द्यावं, मतदान प्रक्रिया नेमकी कशी असते, मतदान कुठे करावं, प्रतिस्पर्धी उमेदवार आणि अधिक तपशील मिळविण्यासाठी तुम्हाला या खास डूडलवर क्लिक करावं लागेल, अशी कॅप्शन या पोस्टला दिली आहे.