Expensive Maggi At Airport: मागील काही दिवसांपासून मल्टिप्लेक्समधील पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्सचे बिल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. नोएडामधील एका थिएटरमध्ये एका ग्राहकाने ५५ ग्रॅम पॉपकॉर्नसाठी ४६० रुपये आणि कोल्डिंकसाठी ३६० रुपये मोजले होते. ज्याचा फोटो ग्राहकाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यावर युजर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यात आता एअरपोर्टवरील एक प्रकरण समोर आले आहे. जिथे एका महिलेने मसाला मॅगी खरेदी केली, ज्याची किंमत ऐकून अनेकांना धक्काच बसला. कारण इतकी महाग मॅगी अनेकांनी पहिल्यांदाच ऐकली असेल. अगदी २ मिनिटात बनणाऱ्या या मॅगीसाठी ग्राहकाकडून चक्क १९३ रुपये आकरण्यात आले. यावर आता युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी किंमतीत जागोजागी फरक असल्याचे म्हटले आहे. तसेच फूड ट्रॅक आणि एअरपोर्टवर खाल्लं तर किंमतीत फरक असणारचं ना असाही युजर्स म्हणत आहेत.
मॅगीच्या १९३ रुपयांच्या बिलाच्या व्हायरल फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, त्यावर पावती क्रमांक आणि बिलाची तारीख आहे. तर मसाला मॅगीचे शुल्क १८४ रुपये आहे. यावर एकूण ९.२० रुपये जीएसटी आकारण्यात आला आहे. यामुळे मॅगीचे एकूण बिल १९३ रुपये झाले आहे. पण ही गोष्ट सोशल मीडिया युजर्सच्या अजिबात पचनी पडलेली नाही. यामुळे युजर्स आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यामुळे काही युजर्सनी विचारले की, मग खरेदी कशाला करायची? यावर महिलेने उत्तर दिले की, मी गेल्या २ तासांपासून उपाशी आहे. त्याचवेळी एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, असे दिसते… ही मॅगी विमानाच्या इंधनापासून बनलेली आहे. तर आणखी एकाने सांगितले की, एअरपोर्टवरील हा सर्वात स्वस्त खाण्याचा पर्याय आहे.
ट्विटरवर हा फोटो (@SejalSud) नावाच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी नुकतेच एअरपोर्टवर १९३ रुपयांना मॅगी खरेदी केली. मला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही, कोणी मॅगी एवढ्या जास्त किंमतीत का विकेल? या पोस्टला आत्तापर्यंत ९ लाख ७८ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि तीन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच शेकडो युजर्सनी प्रश्न विचारला की, मॅगी इतक्या महागात का विकली जात आहे? त्याचवेळी एका यूजरने महिलेला विचारले की, तुम्ही गरीब आहात का? मग घरुन ठेपळा घेऊन जा ना.
