Maharaj Jay Singh and Rolls Royce story : जगातील इतर इतिहासांप्रमाणेच भारतीय इतिहासही प्रतिष्ठा, मान-सन्मान आणि बदला व प्रतिशोधाच्या असंख्य कथांनी भरलेला आहे. त्यातीलच एक प्रसिद्ध कथा म्हणजे अलवरचे राजे महाराज जयसिंग आणि १० रोल्स रॉयस गाड्या यांच्यासंबंधीची. महाराज जयसिंग यांनी ब्रिटिशांकडून झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी थेट १० रोल्स रॉयस गाड्या खरेदी करून, त्या चक्क रस्त्यावरील कचरा साफ करण्यासाठी वापरल्या होत्या. त्या कथेबद्दल आतापर्यंत अनेकांनी कधी ना कधी ऐकले असेलच..
तर, १९१० च्या सुरुवातीच्या काळात महाराज जयसिंग यांनी इंग्लंडला भेट दिली होती. तेथील प्रगत आणि लक्झरी गाड्या पाहून, विशेषतः रोल्स रॉयसने तयार केलेल्या गाड्या पाहिल्यावर त्यांना त्या वाहनांनी अक्षरशः भुरळ घातली होती. मात्र, त्याच गाडीच्या एका शोरूमला भेट देताना, महाराज जयसिंग यांनी अगदी साधा पेहेराव केला होता. त्या शोरूममधील कर्मचारी त्यांना एक सामान्य भारतीय नागरिक समजला आणि त्या कर्मचाऱ्याने जयसिंग यांचा अपमान करून, त्यांना अतिशय उद्धटपणे शोरूममधून निघून जाण्यास सांगितले.
मात्र, जयसिंग यांनी अत्यंत संयमीपणा दाखवून, त्या कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. उलट महाराज जयसिंग जिथे राहत होते, त्या हॉटेलमध्ये जाऊन, आपला राजेशाही पेहेराव करून, रोल्स रॉयसच्या त्या शोरूमला पुन्हा भेट दिली. मग त्यांनी आपल्याला १० गाड्या खरेदी करायच्या असल्याचे सांगितले. या वेळेस मात्र शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी जयसिंग यांचे अत्यंत सन्मानपूर्वक आणि अदबीने स्वागत केले.
मात्र, महाराज जयसिंग भारतात पुन्हा परतल्यावर त्यांनी विकत घेतलेल्या त्या १० रोल्स रॉयसचा वापर आपल्या स्वतःच्या आनंदासाठी केला नाही. उलट त्यांनी या लक्झरी गाड्या चक्क महापालिकेला देऊन, त्यांचा वापर कचरा नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कचरावाहक गाडयांसारखा करण्याची सूचना केली. अर्थात, रोल्स रॉयससारख्या गाडीचा वापर हा कचरा गोळा करण्यासाठी होत असल्याचे पाहून ब्रिटिशांना मात्र चांगलाच धक्का बसला होता.
हा सर्व प्रकार पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महाराज जयसिंग यांची समजूत घालण्याचे आणि त्यांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला होता. मात्र, महाराज जयसिंग हे आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांना ‘रोल्स रॉयस’ला धडा शिकवायचा होता. शेवटी या कंपनीचे प्रतिनिधी लंडनवरून थेट भारतात पोहोचले. त्यांनी महाराज जयसिंग यांची भेट घेऊन, त्यांची माफी मागितली. इतकेच नव्हे, तर त्या लक्झरी गाड्यांच्या जागी त्यांना नवीन कचरावाहक गाडी देण्याचीही तयारी दाखवली. परंतु, महाराज जयसिंग आपल्या निर्णयावर ठाम राहून, ब्रिटिशांनी दिलेली ऑफर नाकारल्याची माहिती डीएनएच्या एका लेखावरून मिळते.
तर यूट्यूबवरील HistoricHindi नावाच्या एका चॅनेलवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार, रोल्स रॉयस कंपनीला त्यांच्या वागण्याचा चांगलाच पश्चात्ताप झाला. त्यांनी पत्राद्वारे महाराज जयसिंग यांची माफी मागितली आणि त्यांनी या लक्झरी गाड्यांमधून कचरा गोळा करू नये, अशी विनंती केली होती. इतकेच नव्हे, तर त्याऐवजी महाराज जयसिंग यांना सहा नवीन गाड्या देण्याचेही कबूल केले. त्यानंतर महाराज जयसिंग यांनी त्या कंपनीला अद्दल घडलीय हे लक्षात घेतले आणि मग त्यांनी पत्रातील विनंतीला मान देऊन, रोल्स रॉयसच्या या आलिशान गाड्यांतून कचरा उचलणे थांबवले, असेही समजते.
व्हिडीओ पाहा :
या कथेबद्दलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनेल्सवरदेखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक व्हिडीओमधील माहिती ही थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी आहे. HistoricHindi नावाच्या चॅनेलवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १२ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.