Latur Farmer Viral Video: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून घरं, इमारती आणि शेतजमिनींचं मोठं नुकसान झालं आहे. अशात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ब्रम्हवाडी गावातून एक हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक ज्येष्ठ शेतकरी आपल्या पाण्याने भरलेल्या शेतात उभा राहून अक्षरशः जीव द्यायची भाषा करताना दिसतोय.

तीन दिवसांचा मुसळधार पाऊस… शेतात पाणीच पाणी… उभं पीक डोळ्यासमोर वाहून गेलं… आणि त्याच क्षणी एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश! “सगळं संपलं… मला जगायचं नाही!” अशी तडफड करत हा शेतकरी पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत होता. गावकऱ्यांनी कसाबसा पकडून त्याला वाचवलं, मात्र या व्हिडीओनं महाराष्ट्राच्या मनाला खोलवर हादरवलं आहे. अखेर काय आहे या व्हिडीओमागचं सत्य?

“सगळं संपलं… मला मरू द्या!

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. प्रत्येक शेतात पाणी शिरल्याने उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ब्रम्हवाडी गावातील एका शेतकऱ्याने आपलं संपूर्ण पीक डोळ्यासमोर बुडताना पाहिलं आणि तो अक्षरशः कोसळून गेला. व्हिडीओमध्ये हा शेतकरी म्हणताना दिसतो – “जमीन गेली, फसलं गेलं, थोडंफार जे होतं तेही वाहून गेलं… आता कसं जगू? मला मरू द्या… सरकार काय करतंय?”

रडत रडत पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न

भावनांनी ग्रासलेला हा शेतकरी आपल्या शेतात उभा राहून रडत, बोंबलत “मी जगणार नाही” असे म्हणत पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत असतो. पण, याच वेळी गावातील काही लोक त्याला पकडून बाहेर खेचतात आणि समजावण्याचा प्रयत्न करतात. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की शेतात चारही बाजूंनी पाणीच पाणी भरलं आहे आणि एक-दोन वगळता बाकीचं पीक पूर्णपणे बुडालं आहे.

मदतीची याचना, सरकारकडे अपेक्षा

लातूर जिल्ह्यातील या परिस्थितीने शेतकऱ्यांचा आक्रोश उफाळून आला आहे. पावसाने सगळं उद्ध्वस्त केल्यामुळे शेतकरी आता अक्षरशः हतबल झाले आहेत. हातात काहीही उरलं नाही, तर कुटुंबाचा संसार कसा चालवायचा हा प्रश्न त्यांना छळतोय. व्हिडीओमधील हा शेतकरी वारंवार म्हणतो, “सगळं वाहून गेलं, फसलं संपलं, मुलं आहेत… मी काय करू? मला मरू द्या!”

येथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने असंख्य लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अन्नदात्याची अशी दयनीय अवस्था पाहून लोक सरकारकडे तातडीने मदतीची मागणी करत आहेत.

पावसाच्या या तडाख्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची खरी शोकांतिका उघड झाली आहे… आता पाहावं लागेल की प्रशासन या शेतकऱ्यांना कधी आणि कितपत दिलासा देणार!