माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अनेक चाहते धोनीची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. शिवाय धोनीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याचं कारण म्हणजे, धोनी सोशल मीडियापासून लांब राहतो. तो प्रसिद्धीपासून दूर राहून साधे जीवन जगणे पसंत करतो. त्यामुळे त्यांचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर आला की तो वेगाने व्हायरल होतो. नुकतेच काही दिवसांपुर्वी माहीचा विमानातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो इकॉनॉमी क्लासमध्ये बसून कँडी क्रश गेम खेळताना दिसत होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनीही त्याच्या साधेपणाचे कौतुक केले होते. अशातच आता धोनीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो इकॉनॉमी क्लासमध्ये झोपलेला दिसत आहे.
हेही पाहा- लग्नानंतर वधू-वरासह वऱ्हाडाने उंच कड्यावरुन मारल्या उड्या, थरारक घटनेचा Video व्हायरल
धोनी विमानात झोपलेला व्हिडीओ व्हायरल –
धोनी विमानात झोपलेला हा व्हिडिओ एका एअर होस्टेसने बनवला आहे, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये धोनी झोपलेला दिसत आहे. तर त्याची पत्नी साक्षी शेजारच्या सीटवर बसलेली दिसते, यावेळी साक्षी मोबाईल वापरत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओतील एअर होस्टेसच्या हावभाव पाहून तिला धोनीला जवळून पाहिल्याचा खूप आनंद झाल्याचं दिसत आहे. अनेक चाहत्यांना हा व्हिडीओ आवडल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय नेटकरी या व्हायरल व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, काही लोकांनी या व्हिडीओवर आक्षेपदेखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अनेकांनी धोनी आणि त्याच्या पत्नीच्या प्रायव्हसीचा भंग केल्याप्रकरणी एअर होस्टेसवर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हा एका व्यक्तीच्या प्रायव्हसीचा भंग आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “धोनी आणि त्याच्या पत्नीच्या प्रायव्हसीचा भंग करत आहे, हे पूर्णपणे चुकीचे आहे.”
तर काही नेटकऱ्यांनी आम्हालाही धोनीला असं पाहायचं आहे, असं कमेंटमध्ये लिहिलं आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असले तरी हा व्हिडीओ मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.