Viral Video: स्वतःचे घर बांधणे किंवा विकत घेणे हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वांत मोठे स्वप्न असते. त्यासाठी लोक अनेक वर्षे पैसे साठवतात, पॉलिसी काढून त्यात महिन्याला पैसे भरतात, दोन ठिकाणी पार्ट टाइम नोकरी करतात. उदाहरणार्थ- ९ ते ६ नोकरी करून नंतर स्विगीच्या ऑर्डर, ओला-उबर चालवणे इत्यादी. आज एका ऑटोरिक्षा चालकाची गोष्ट व्हायरल होत आहे. त्याने रिक्षा चालवून पैसे जमा केले आणि स्वत:साठी एक सुंदर घर बांधले. पण, घर बांधण्यास हातभार लावणाऱ्या ऑटोरिक्षाचेही त्याला आभार मानायचे होते. या रिक्षासाठी चालकाने नक्की काय केले ते या लेखातून जाणून घेऊ.

एका ऑटोरिक्षा चालकाने अनेक वर्षांपासून रिक्षा चालवून पैसे जमा केले. काही दिवसांनी त्याने स्वतःचे घर बांधण्यास सुरुवात केली. घर बांधून झाल्यावर त्याने विचार केला की, स्वप्नपूर्तीसाठी मदत करणाऱ्या ऑटोरिक्षाला विसरून कसे चालेल? मग त्याला एक युक्ती सुचली. पूर्ण घर व्यवस्थित बांधून झाल्यानांतर त्याने त्याच्या घराच्या गच्चीवर क्रेनच्या साह्याने रिक्षा चढवली आणि तेथे ती रिक्षा कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला. ऑटोरिक्षाला दिलेला सन्मान एकदा तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…पराभव पचवणे अवघड! ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर भारतीय पदार्थांचा स्टॉल; ६८ वर्षांच्या शेफचा हा VIDEO पाहून तुम्हीही भारावून जाल

व्हिडीओ नक्की बघा…

जेव्हा आपल्याला पैशांची गरज असते तेव्हा एखादा मित्र आपल्याला मदत करतो. कठीण प्रसंगी मित्राने केलेल्या मदतीचा आपल्याला कधी विसर पडत नाही. तसेच काहीसे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या या ऑटोरिक्षाला न विसरता या मालकाने सन्मान दिला आणि घराच्या गच्चीवर रिक्षाला अगदी व्यवस्थित कायमस्वरूपी स्थान देण्यात आले आहे. तसेच ‘चालकाने रिक्षा चालवून, त्यातून मिळणाऱ्या पैशातून हे घर बांधलं आहे’ अशी या व्हिडीओची माहिती व्हॉइस ओव्हरमधून देण्यात आली आहे.

हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, रिक्षा क्रेनच्या साह्याने टेरेसवर चढवली जाते आहे हे पाहून आजूबाजूच्या परिसरात नागरिकांची एकच गर्दी दिसते आहे आणि अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसते आहे. येथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर तो @aryantyagivlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हा अनोखा निर्णय घेणाऱ्या रिक्षाचालकाचे नेटकरी कौतुक करीत आहेत. तसेच काही जण सुरक्षेची चिंतादेखील व्यक्त करताना दिसत आहेत.