अनेकदा आपण रेल्वेमधून प्रवास करताना गाडीला खूप गर्दी असल्याचे पाहिले आहे. आता ही गर्दी केवळ सामान्य [जनरल] डब्यांमध्ये नसून, आरक्षित डब्यांतही आपल्याला दिसते. या गर्दीचा आधीच आरक्षणाद्वारे सीट बुक केलेल्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात एकाने एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्याने अशाच खूप गर्दी असणाऱ्या गाडीचा आणि त्या गर्दीमुळे त्याला दोन तास रेल्वेच्या दारात उभे राहून प्रवास करावा लागल्याचा किस्सा सांगितला आहे. आभास कुमार श्रीवास्तव [Abhas Kumar Shrivastava] असे या एक्स वापरकर्त्याचे नाव असून, त्याने प्रवासात स्वत:ला मोठ्या प्रमाणात झालेल्या त्रासाबद्दल सांगत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार रेल्वेच्या डब्यात इतकी गर्दी होती की, प्रवासाच्या सुरुवातीला त्याला काही वेळ त्याच्या सीटपर्यंत पोहोचणेसुद्धा मुश्कील झाले होते. त्यामुळे आधी तासभर तो गाडीच्या दारात तसाच थांबून होता. नंतर जागा मिळताच तो आपल्या सीटपर्यंत पोहोचला; मात्र त्याच्या जागेवर एक गरोदर महिला बसली असल्याने, माणुसकी म्हणून तिला उठण्यास न सांगता, पुढील सर्व प्रवासही त्याने उभ्यानेच केला.

हेही वाचा : Viral video : वाह!! पठ्याने चक्क ट्रॅक्टरवर बसून झाडाला रस्ता; हा जुगाड पाहून नेटकरीदेखील झालेत थक्क, व्हिडीओ पाहा

या प्रकारामुळे कोणताही प्रवासी नाराज होणे फारच स्वाभाविक आहे. त्यामुळे इंटरसिटी ट्रेनचे आरक्षित तिकीट असूनही असा प्रवास करावा लागल्याने आभासने आपल्या सोशल मीडियावरून आयआरसीटीसी [IRCTC] आणि रेल्वेमंत्र्यांचे उपरोधिकपणे आभार मानले आहेत.

“चार दिवसांआधी मी रेल्वेचे तिकीट बुक केले होते आणि ते कन्फर्मदेखील झाले होते. मात्र, गाडीच्या डब्यात चढताच सुरुवातीला साधारण तासभर मला माझ्या सीट क्रमांक ६४ पर्यंत पोहोचता आले नाही आणि जेव्हा मी पोहोचलो तेव्हा एक गरोदर महिला माझ्याच जागेवर बसलेली होती. त्यामुळे पुढील प्रवाससुद्धा मला गाडीच्या दारात उभे राहूनच करावा लागला आहे. हातामध्ये तिकीट असूनही मला उभ्याने प्रवास करायला लावल्याबद्दल आणि अशा अविस्मरणीय प्रवासाबद्दल तुमचे खूप खूप आभार” असे आभासने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यासोबतच गर्दीने भरलेल्या आणि डब्याच्या अरुंद रचनेचा फोटोसुद्धा शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमेंट्समध्ये गाडीचे फोटो बघून, तो चुकीच्या डब्यामध्ये शिरला असावा, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली होती. मात्र, आभासने, सेकंड क्लास नॉन एसीचे तिकीट बुक केले असल्याचे सांगितले आहे आणि सोबत तिकिटाचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. हे डबे साधारण इंटरसिटी किंवा जनशताब्दी गाड्यांमध्ये दिवसा उपलब्ध असतात. मात्र, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या गर्दीमुळे सामान्य डब्यातून प्रवास करण्याचा अनुभव मिळाल्याचे आभास सांगतो.