Mom Finds Baby’s Cancer By Mobile Flash Light: लंडनमधील एका महिलेने तिच्या फोनच्या कॅमेऱ्यातील फ्लॅशचा वापर करून तिच्या बाळाला झालेला दुर्मिळ कर्करोग शोधल्याची सध्या चर्चा आहे. सारा हेजेस असे या महिलेचे नाव असून नोव्हेंबर २०२२ मध्ये स्वयंपाकघरात रात्रीचे जेवण बनवत असताना तिला तिच्या तीन महिन्यांच्या बाळाच्या डोळ्यात पांढऱ्या रंगाचं काहीतरी चमकताना दिसलं. न्यूयॉर्क पोस्टनुसार, मांजरीच्या डोळ्यावर प्रकाश पडल्यास ज्याप्रकारे डोळे चमकतात तशी काहीशी चमक दिसून आल्याचे साराने सांगितले होते. उजेडात पुन्हा अशीच चमक दिसतेय का हे पाहण्यासाठी साराने बाळाच्या डोळ्यावर तिच्या फोनच्या फ्लॅश लाईटने प्रकाश टाकला आणि आणखी काही फोटो काढले.
पहिल्या प्रयत्नात, साराला पहिल्यासारखी चमक किंवा अन्य काहीच लक्षण दिसले नाही म्हणून तिने तिचा मुलगा थॉमसला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फिरवले आणि वेगेवेगळ्या प्रकाशात त्याच्या डोळ्याचे निरीक्षण केले आणि असं करताना तिला पुन्हा एकदा आधीसारखा चमचमता बिंदू डोळ्यात दिसून आला. तिने ही लक्षणे शोधण्यासाठी गूगलची मदत घेतली असता त्यात हा कर्करोग असू शकतो असे तिच्या लक्षात आले. तपासणीसाठी शेवटी साराने थॉमसला डॉक्टरनकडे नेले असता तिथे साराचा संशय खरा सिद्ध झाला.
थॉमसला कॅन्सर झाल्यावर काय घडलं?
आउटलेटने म्हटल्याप्रमाणे, तीन महिन्यांच्या थॉमसला खरोखरच रेटिनोब्लास्टोमाचे निदान झाले होते, हा डोळ्यांच्या कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार आहे जो लहान मुलांना प्रभावित करतो. साराने हॉस्पिटलमधील त्या प्रसंगाविषयी सांगताना म्हटले की, “मी वॉशरूमला गेले होते तेव्हा बाहेर येताच दारात डॉक्टर माझी वाट पाहताना दिसले, मला तेव्हाच संशय आला की ही काहीतरी वाईट बातमी असणार, शेवटी तसेच झाले.”
दरम्यान, थॉमसला तिथून उपचारासाठी रॉयल लंडन रुग्णालयात घेऊन जाण्यास डॉक्टरांनी सुचवले होते. नोव्हेंबर २०२२ पासून त्याच्या केमोथेरपीच्या सहा फेऱ्या झाल्या आणि सेप्सिसशी झुंज दिल्यानंतर, त्याने एप्रिल २०२३ मध्ये केमोथेरपीची अंतिम फेरी पूर्ण केली आणि मे मध्ये त्याला कर्करोगमुक्त घोषित करण्यात आले. सारा यांनी दिलेल्या सद्य माहितीनुसार आता थॉमसची तब्येत आता सुधारत आहे.
डोळ्याच्या कर्करोगाची लक्षणे काय?
इथे लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे बाळाच्या बाबत पालकांनी नेहमीच सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. या विशिष्ट कर्करोगाविषयीच सांगायचे झाल्यास नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्यांचा एक दुर्मिळ प्रकारचा कर्करोग आहे जो लहान मुलांना प्रभावित करू शकतो, मुख्यतः तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना याचा धोका असतो.
हे ही वाचा<< तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र
हा रोग एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये असू शकतो आणि डोळ्याच्या मागील बाजूस (रेटिना) प्रभावित करतो. रेटिनोब्लास्टोमाच्या लक्षणांमध्ये डोळ्यात एक पांढरा चमकणारा बिंदू दिसून येतो, जो डोळ्यावर विशिष्ट प्रमाणात प्रकाश पडल्यास स्पष्ट दिसतो. तसेच डोळ्याच्या स्वरुपात बदल किंवा सुजलेल्या डोळ्यांचा त्रास वारंवार होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.