माणूस आणि प्राणी यांच्यात एक मैत्रीचं नातं असतं, असं म्हटलं जातं. कारण आपण प्राण्यांना जेवढा जीव लावतो त्याच्यापेक्षा जास्त ते आपल्यावर जीव लावतात. याबाबतची अनेक उदाहरण आपण याआधीही पाहिली आहेत. ज्यामध्ये कधी एखादा कुत्रा आपल्या मालकाला संकटात मदत करतो. तर कधी माजंर मालकासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालते. सध्या उत्तर प्रदेशातील अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक माकड त्याला रोज भाकरी खायला घालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणून त्याच्या मृतदेहाशेजारी बसून रडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या माकडाने त्याला भाकरी खाऊ घालणाऱ्या व्यक्तीची शेवटच्या क्षणापर्यंत साथ सोडली नसल्याचं लोक म्हणत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह दिसत आहे, या मृतदेहाच्या शेजारी त्या व्यक्तीचे कुटुंबीय बसले आहेत. शिवाय तिथे एक माकड बसल्याचंही दिसत आहे. जे व्यक्तीच्या मृत्यूने दुःखी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सांगितलं जात आहे की, जोया भागातील रहिवासी राम कुंवर सिंह यांच्या जवळ एक माकड रोज एक माकड येऊन बसायचं. यावेळी ते माकडाला काहीतरी खायला द्यायचे. हळुहळू माकड आणि राम कुंवर सिंग यांच्यात चांगली मैत्री झाली होती.
हेही पाहा- भरधाव ट्रेनला लटकत तरुणांचा जीवघेणा स्टंट, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO आला समोर
मृतदेहाजवळ बसून रडले माकड
राम कुंवर सिंह यांचे १० ऑक्टोबर रोजी निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूनंतर एक माकड त्याच्या घरी पोहोचले, यावेळी तिथे लोकांनी खूप गर्दी केली होती. तरीही ते माकड राम कुंवर यांच्या मृतदेहाजवळ जाऊन दु:खी चेहरा करुन बसले. यावेळी माकडाच्या डोळ्यात अश्रू आल्याचंही लोकांनी सांगितलं. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा राम कुंवर यांना अंत्यसंस्कारासाठी नेले तेव्हाही माकड त्यांच्या शरीराला चिकटून बसले होते. व्हायरल व्हिडीओमध्ये माकड मृतदेहाला चिकटून बसल्याचं दिसत आहे. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडले त्या ठिकाणी ते ४० किलोमीटर चालत गेल्याचंही सांगितलं जात आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
राणा यशवंत नावाच्या युजरने व्हिडिओ शेअर करत लिहिलं, “निःस्वार्थ प्रेमाचे यापेक्षा मोठे उदाहरण काय असू शकते, एक व्यक्ती या माकडाला रोज खायला घालायचा, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर हे माकड ढसाढसा रडले. घरापासून स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व विधींमध्ये ते सहभागी झाले होते.” तर अनुराग वर्माने लिहिलं, “प्रेमाची भाषा माणसांपेक्षा जास्त मुक्या प्राण्यांना समजते.” तर आणखी एकाने लिहिलं, “फक्त प्राणीच निस्वार्थपणे प्रेम करतात, माणूस केवळ आपल्या स्वार्थासाठी जगतो.”