Mumbaikar Influencer Vadapav Video: वडापाव.. वडापाव.. काय आहे वडापाव? मुंबईकरांचा जीव आहे वडापाव, कष्टकऱ्यांचं जेवण आहे वडापाव, लाखोंना पोसणारा व्यवसाय आहे वडापाव, नुसता वडा आणि पाव नाही मराठी माणसाची ओळख सुद्धा आहे वडापाव. आजवर आपण वडापावचं कित्येकदा कौतुक ऐकलं असेल, कविता, निबंधांपासून ते रील्सपर्यंतचा प्रवास या मराठमोळ्या पदार्थाने पहिला आहे, अनुभवला आहे. वडापाव प्रेमींना भाषा, जात, धर्म, प्रांत कशाचंच बंधन नाही असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही म्हणूनच आजवर अगदी क्वचितच कुणी वडापाव या रेसिपीवर टीका केली असेल. पण सध्या एका इन्फ्लुएन्सरने वडापाववर टीका करताना वापरलेले शब्द ऐकून नेटकऱ्यांचा प्रचंड संताप होत आहे. विशेष म्हणजे ही इन्फ्लूएन्सर स्वतः सुद्धा मुंबईकर आहे असं समजतंय. एका मुलाखतीत साक्षी शिवदासानी हिने वडापाववर आपलं मत देताना केलेलं भाष्य ऐकल्यावर कमेंट्समध्ये अनेकांनी तिची शाळाच घेतली आहे. नेमका हा प्रकार काय, हे पाहूया..
साक्षीने @thehavingsaidthatshow या इन्स्टाग्राम पेजला दिलेल्या मुलाखतीत वडापावला कचरा म्हणूनच आपलं मत द्यायला सुरुवात केली. वडापावला कचरा म्हटल्याने पहिलं आश्चर्य तर मुलाखत घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरच दिसून आलं. साक्षी म्हणते की, “मला वडापाव अजिबात आवडत नाही, मला मनापासून त्या पदार्थाचा रागच येतो, वडापाव मध्ये काही लॉजिकचं नाहीये म्हणजे ब्रेड आणि बटाटा याचं काय कौतुक आहे” यावर पॉडकास्टमधील अन्य एक जण तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणतो की, “एकतर तो ब्रेड नाही पाव आहे, आणि नुसता उकडलेला बटाटा नसतो, चटणीला विसरू शकत नाही”, तर यावर साक्षी म्हणते की, “चटणीचं काय, कुठल्याही पदार्थावर चटणी चोपडली की ते छान लागतं त्यात वडापावचं कौतुक नाही, एकवेळ सामोसा पाव पण ठीक आहे पण वडापाव म्हणजे कधीच भारी असा म्हणता येणार नाही?”
मुलाखतकाराने तिला पुढे समजावताना, “कदाचित चव आवडली नाही तरी वडापाव त्यापेक्षा खूप काही आहे, म्हणजे एकतर स्वस्त, परवडणारा पदार्थ आहे, अगदी मॅकडोनाल्डचा मॅक आलू टिक्की पण बेस्ट पर्याय आहे.” साक्षीने यावर दिलेलं उत्तर ऐकून तर मुलाखत घेणाऱ्यांनीच तिची मतं वादग्रस्त आहेत म्हणत हसायला सुरुवात केली. तुम्ही सुद्धा हे मत पाहा..
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून साहजिकच चिडलेल्या मुंबईकरांनी यावर कमेंट करत टीका केली आहे. “हे लोक एखाद्या महाग कॅफे मध्ये जाऊन कॉफी आणि हॅश ब्राऊन (नुसता तळलेला बटाटा) खाणार आणि त्याला कमाल म्हणणार आणि इकडे वडापाववर ज्ञान पाजळतायत.”, “वडापाव मुंबईमध्ये फक्त एक पदार्थ नाहीये, इथल्या लोकांचं प्रेम आहे आणि जगात लोकं त्याचं कौतुक करतात हिला फक्त प्रसिद्ध गोष्टीवर टीका करून व्हायरल व्हायचं आहे.”, “तू अवाकाडो खा नाहीतर आणखी काही, टीका पण कर पण वडापावला कचरा म्हणायची काय गरज, लाखो लोकं त्याच्या जीवावर जगतायत.” अशा कमेंट्स या व्हिडीओखली दिसत आहेत. काहींनी साक्षीला मुंबईकरांना अजिबात न आवडणारी मुलगी असं सुद्धा म्हटलं आहे.