Navratri Celebrate in local : मुंबईची लोकल ट्रेन ही नेहमीच गर्दी, धावपळ आणि गोंधळासाठी ओळखली जाते. पण, नवरात्रीच्या सणात, काही तासांसाठी हीच ट्रेन जणू उत्सवाचे स्टेज बनते. गुरुवारी सकाळी १०:१६ वाजता बोरिवली ते चर्चगेट जाणाऱ्या AC लोकलच्या लेडीज कोचमध्ये घडलेल्या एका मनमोहक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात प्रवासी महिला अचानक गरब्यासाठी उभ्या राहिल्या आणि संपूर्ण कोच उत्सवी रंगात रंगला.
पिवळ्या रंगात सजलेल्या महिलांनी पारंपरिक पोशाख किंवा फॉर्मल कपड्यांतून एकरूपता साधली होती. पार्श्वभूमीला गुजराती लोकसंगीत वाजत असताना काही महिलांनी पुढे येऊन गरबा स्टेप्स करीत नाच केला आणि त्यांना इतर प्रवाशांनीही टाळ्या वाजवून गायनाद्वारे साथ दिली आणि उत्साह दाखवीत त्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे नेहमीचा साधा दैनंदिन प्रवास काही मिनिटांतच उत्सवाच्या वातावरणात बदलला आणि प्रवाशांना एकत्र येऊन सण साजरा करण्याची संधी मिळाली. हा व्हिडीओ फ्री प्रेस जर्नलच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे.
मुंबई लोकल ही सामान्यत: गर्दी, भांडण आणि मारामारी यांसाठी ओळखली जाते, पण नवरात्रीच्या काळात अशा काही उत्साहवर्धक क्षणांमुळे नेहमीची घाई-गर्दी अन् धावपळीमुळे थकून जाणाऱ्या शहरी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. महिलांचे हसणे, नाचणे आणि आनंद साजरा करणे हे शहराच्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवते. तसेच घर संसार आणि नोकरी सांभाळून थोडा वेळ स्वत:साठी याठिकाणी या महिलांनी काढला आहे.
पाहा व्हिडिओ
हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये, वेगवेगळ्या सणांना लोकल ही आपल्याला नटलेली दिसत असते. दरम्यान फक्त महिलाच नाहीतर पुरुषसुद्धा मागे नाहीयेत. एका व्हायरल व्हिडीओमध्ये पुरुषांचा गट पारंपरिक गरबा तालावर नाचताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गर्दीतही पुरुषांनी ताल धरला. या ऊर्जा आणि उत्साहाने लोकलचा संपूर्ण डबा हर्षभरीत झाला, ज्यामुळे हळूहळू इतर प्रवाशांच्याही ताल धरला आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर नकळत हसू फुलले.
नवरात्रीच्या काळात असे व्हिडीओ दाखवून देतात की, मुंबई लोकल फक्त प्रवासाचे माध्यम नाही, तर ती शहराचा सांस्कृतिक आत्मा जिवंत ठेवणारी अशी जागा आहे. तिथे पुरुष असो किंवा महिला, ओळखीचे प्रवासी असोत किंवा अपरिचित, सर्वांना सण साजरा करण्याची मजा अनुभवता येते.
मुंबईतील लोकलमध्ये नवरात्रीचा उत्साह हा शहराचा जिवंतपणा, सहकार्य आणि आनंद साजरा करण्याच्या वृत्तीचे प्रतीक आहे. गर्दीच्या जीवनात अन् मुंबईच्या लोकल प्रवासातही सण साजरा होतो, जो प्रवाशांच्या जीवनात रंग भरतो. या व्हिडीओंमुळे लोकांना हसणे, नाचणे आणि एकत्र सण साजरा करण्याची प्रेरणा मिळते. मुंबईची लोकल हे केवळ प्रवासाचे साधन नाही, तर शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाची ती खरी ओळख आहे, जिथे प्रत्येक प्रवासी हा उत्सवाचा भाग बनू शकतो.