हरियाणामध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या हिंसाचारामुळे हरियाणासह पश्चिम उत्तर प्रदेशचे पोलीस-प्रशासन अलर्ट मोडवर आहे. या हिंसाचाराबाबत देशातील विविध नेत्यांकडून शांततेचं आवाहन केलं जातं आहे. तर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नुहमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून परिस्थिती सामान्य झाल्याचं सांगितलं आहे. मात्र अन्य काही ठिकाणी हिंसाचाराच्या काही घटना घडल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. शिवाय प्रशासनाकडून नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अशातच आता भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सचिन हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सचिनने क्रिकेट करिअरला सुरुवात केली तेव्हाचा आहे. या व्हिडिओमध्ये सचिनसह बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांच्यासह अनेक अभिनेते आणि अभिनेत्री दिसत आहेत. या व्हिडिओद्वारे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला जात असून नूह हिंसाचारानंतर आता तो पुन्हा व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकरचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल –

या व्हिडिओच्या सुरुवातीला सचिन तेंडुलकर म्हणतो, “जेव्हा आम्ही भारतासाठी खेळतो तेव्हा आम्ही एक टीम असतो. तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम याने मैदानावर काही फरक पडत नाही. मी सचिन तेंडुलकर आहे आणि सर्वप्रथम मी भारतीय आहे.” सचिनसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन, तब्बू, अनुपम खेर, शबाना आझमी यांच्यासह साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारही मी भारतीय आहे, असे म्हणताना दिसत आहेत. २९ सेकंदांचा हा व्हिडिओ भारतातील नागरिकांना आपापसात ऐक्य राखण्याचा संदेश देत आहे.

पोलीस-प्रशासन सतर्क –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नूह आणि मणिपूर हिंसाचारानंतर हा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओचा उद्देश हिंदू-मुस्लिम यांच्यात ऐक्याची भावना निर्माण व्हावी हा आहे. एकीकडे नूह हिंसाचारानंतर गुरुग्राम आणि फरिदाबादमधील पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेश सरकारने पश्चिम उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. या हिंसाचारात मृतांची संख्या आतापर्यंत सहा झाली. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले की हिंसाचाराच्या घटनांमध्ये जखमी झालेल्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत ११६ जणांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींना पकडण्यासाठी शोध सुरू आहे. या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे खट्टर यांनी स्पष्ट केलं आहे.