Raju Kalakar Viral Video: आजच्या डिजिटल युगात प्रसिद्धी मिळविण्यासाठी रिअॅलिटी शोच्या दाराशी रांगा लावण्याची गरज उरलेली नाही. एक भन्नाट रील, थोडा वेगळा हटके प्रयोग आणि संपूर्ण सोशल मीडियावर तुफान निर्माण होऊ शकतं. असंच काहीसं घडलंय एका सामान्य; पण टॅलेंटेड व्यक्तीसोबत, ज्याचं राजू कलाकार हे नाव आज संपूर्ण देशाला माहीत झालं आहे.
सध्या सोशल मीडियावर एक खास गाणं जबरदस्त ट्रेंड करत आहे. “दिल पे चलाई छुरियां”. १९९५ साली आलेल्या ‘बेवफा सनम’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटातील हे गाणं आणि सोनू निगम यांचा आवाज पुन्हा एकदा लोकांच्या तोंडून ऐकायला मिळू लागलाय. पण, यावेळी कारण वेगळं आहे. कारण- या गाण्याला सोशल मीडियावर नव्यानं जीव देणारा कलाकार म्हणजे राजू कलाकार.
राजू कलाकार यानं काही दिवसांपूर्वी एक साधा व्हिडीओ पोस्ट केला. हातात दोन दगड घेऊन, रस्त्यावर काही लोकांमध्ये उभा राहून, त्यानं “दिल पे चलाई छुरियां” हे भावनांनी भरलेलं गाणं एवढ्या आत्मीयतेनं गायलं की, सोशल मीडियावर त्यानं त्सुनामीसारखी लोकप्रियता मिळवली. त्याच्या आवाजातील वेदना, आणि त्याचा अभिनय हे सगळं काही इतकं प्रभावी ठरलं की, व्हिडीओ पाहणारे केवळ थक्कच झाले नाहीत, तर वेगवेगळ्या रील्स, मिम्स आणि शॉर्ट व्हिडीओद्वारे या गाण्यावर स्वतःही परफॉर्म करू लागले आहेत.
राजस्थानचा मूळ रहिवासी आणि सध्या गुजरातच्या सुरत शहरात राहणारा राजू भट्ट, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर १६ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यानं एक वेगळाच ट्रेंड सुरू केला आहे. त्यानं कोणतंही महागडं वाद्य न वापरता, फक्त दोन साधे दगड आणि त्यानं भावपूर्ण आवाजात गायलेलं गाणं हीच त्याच्या गायनाच्या यशस्वीतेची साधनं आहेत. त्याच्या आवाजातली खिन्नता, व्यथा आणि जादू इतकी खोलवर जाते की, आज संपूर्ण इंटरनेट या गाण्यावर थिरकत आहे. व्हिडीओ पाहणारे लोक त्याच्या या गाण्यानं अक्षरशः मंत्रमुग्ध झाले आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नीदेखील या ट्रेंडमध्ये सामील झाले असून, त्यांनी खास रील तयार केली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स राजूच्या अंदाजातच वेगवेगळ्या आणि फनी रील्स बनविताना दिसत आहेत. राजू सांगतो, “एकदा ट्रेनमध्ये प्रवास करताना एका मुलाकडून मी हे दगड वाजवून संगीत कसं निर्माण करायचं ते शिकलो. तेव्हा कल्पनाही नव्हती की, हे एक दिवस मला देशभरात ओळख मिळवून देईल.” आज ‘राजू कलाकार’ हे नाव इंटरनेटवर गाजत आहे.