विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यातील पराभवाचं शल्य तमाम भारतीयांच्या मनात अजूनही जाचत आहे. त्या संघातील अनेक खेळाडू आता हळूहळू पराभवाबाबतच्या आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. एकीकडे या पराभवामुळे आलेली निराशा दूर सारण्याचा प्रयत्न क्रिकेटपटू करत असताना दुसरीकडे भारताचा दुसरा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमार यादव या संघाचं नेतृत्व करत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माला रडताना भारतीय क्रिकेट चाहत्यांनी पाहिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

फक्त २२ सेकंदांचा हा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) ट्रेंड होण्यासाठी पुरेसा ठरला आहे. एका हॉटेल किंवा रोहित शर्माच्या सोसायटीखालचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका व त्यांची मुलगी एका महिलेसह एका इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहेत. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने रोहित शर्माची मुलगी समायराला विचारलेल्या प्रश्नांचं तिनं दिलेलं निरागस उत्तर सोशल ट्रेंड झालं आहे!

काय झालं संभाषण?

व्हिडीओ काढणारी व्यक्ती व त्यांच्यासमवेत उभ्या इतर काही व्यक्तींनी समायराशी संवाद साधल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे. यात “हाय, तू कशी आहेस?” या प्रश्नावर “छान” असं उत्तर समायरानं दिलं. पुढचाच प्रश्न तिच्या वडिलांबद्दल अर्थात कर्णधार रोहित शर्माबद्दल होता. पण या प्रश्नांनाही समायरानं अतिशय समजूतदारपणा दाखवत शांतपणे आणि तितक्याच निरागसपणे उत्तर दिल्यामुळे तिचं कौतुक होत आहे.

“तुझे वडील कुठे आहेत?” असा प्रश्न विचारल्यावर समायरा तिथे थांबली आणि तिनं सविस्तर उत्तर दिलं. “माझे वडील त्यांच्या खोलीत आहेत. ते आत्ता शांत आहेत. पॉझिटिव्ह आहेत. पण एका महिन्यात ते पुन्हा हसतील”, असं उत्तर समायरानं दिलं! एवढं बोलून समायरा तिच्या आईसोबत बाहेर निघून गेली.

Australia Won World Cup 2023 Final: अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर, सगळ्यांना हस्तांदोलन करून होताच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नेमका कधीचा?

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर रोहित शर्माच्या डोळ्यांमधले अश्रू तमाम भारतीयांनी पाहिले होते. त्यामुळे अंतिम सामन्यानंतरचाच हा व्हिडीओ असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. मात्र, हा व्हिडीओ जवळपास एक ते दीड वर्षांपूर्वीचा असून करोना काळातला असल्याचं आता समोर आलं आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये समायरा तिच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती देत असल्याचंही आता सांगितलं जात आहे.