दिव्यांग व्यक्तींसाठी लढणारी एक्स(ट्विटर) युजर विराली मोदी नेहमीच त्यांच्या पोस्टमधून दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सगळ्यांसमोर मांडत असतात. अलीकडेच महिलेने विमान प्रवासाचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. विमानातून उतरण्यासाठी व्हीलचेअरची सोय न केल्यामुळे विमानात त्या चक्क ४० मिनिटे एकट्याच बसून राहिल्या.
विराली मोदी या महिलेला २००६ पासून कंबरेपासून खाली अर्धांगवायू झाला आणि तेव्हापासून त्या हालचाल करण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करतात. महिला ५ डिसेंबर २०२३ रोजी इंडिगो कंपनीच्या विमानाने प्रवास करून मुंबईत आल्या. त्यांच्या फ्लाईटचा क्रमांक 6E-864 हा होता. दिल्लीहून निघालेले त्यांचे विमान मुंबई विमानतळावर पोहचले. सर्व प्रवासी आणि विमानातील कर्मचारीही विमानातून उतरले. मात्र, त्यांना विमानातून उतरवण्यासाठी आणि व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यासाठी कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यामुळे त्या ४० मिनिटे विमानात एकट्याच बसून राहिल्या. जेव्हा सफाई कर्मचारी विमानात आले, तेव्हा त्यांना विमानातून उतरवण्यात आले.
पोस्ट नक्की बघा :
विमानातून उतरवल्यानंतर महिलेने आणखीन ३० मिनिटे वाट पाहिली आणि त्यांना वैयक्तिक व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली. व्हीलचेअर देण्यासाठी आलेले कर्मचारी इंडिगो कंपनीची उशी समजून महिलेच्या वैयक्तिक व्हीलचेअरची उशी घेऊन गेले. घडलेला सर्व प्रकार कळवण्यासाठी घरी आल्यानंतर विराली मोदी यांनी इंडिगो कंपनीच्या कॉल सेंटरला फोन केला. मात्र, प्रतिनिधींशी बोलण्यासाठी त्यांना ५५ मिनिटे वाट बघावी लागली. तसेच या घटनेसंदर्भात प्रतिनिधींनी त्यांना एक ई-मेल करण्यास सांगितला; असे महिलेने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
दिव्यांग महिलेची पोस्ट पाहून इंडिगो विमान कंपनीने कर्मचारी प्रणाली यांच्याकडून महिलेसाठी व्हीलचेअरवर ठेवण्यासाठी नवीन खास उशी पाठवली. याचा व्हिडीओ आणि फोटो महिलेने शेअर केला आहे. तसेच या घटनेचे अगदी खास पद्धतीत निराकरण करण्यासाठी इंडिगो कंपनीला धन्यवाददेखील म्हटलेच आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट दिव्यांग महिला विराली मोदी यांच्या @Virali01 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.