Viral video: सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे पावसाळ्यात निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात नको तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा चांगलेच जीवावर बेतते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील, ज्यांत काही लोक आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या अशा वागण्याने त्यांना मोठी किंमतही चुकवावी लागते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. कित्येक वेळा स्टाईल मारण्याच्या नादात काही जण अशी स्टंटबाजी करतात, की त्यांना आपण कायदा हातात घेत असल्याचंही भान उरत नाही.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदीला पूर आला आहे, प्रचंड वेगाने पाण्याचा प्रवाह आहे. यावेळी एकानं महिंद्रा एसयूव्ही कार थेट पुराच्या पाण्यात घातली. या तरुणानं पूर आलेली नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्याच क्षणी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले. महिंद्रा एसयूव्ही नदीच्या प्रवाहात अक्षरश: वाहून गेल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये गाडी पाण्याच्या प्रवाहात कशाप्रकारे सहज ओढली गेली हे दिसत आहे.

आजुबाजूला जमलेले लोकंही धोकादायक प्रयत्न पाहून हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये, दोन पुरुष दिसत आहेत, एक गाडी चालवत आहे आणि दुसरा गाडीच्या मागे उभा आहे. एसयूव्ही पुढे सरकताच पाण्याचा प्रवाह वेगाने त्यावर येतो. काही सेकंदातच, कार बाजूला वळते आणि ती आणखी खाली ओढली जाते अन् अखेर कार वाहू जाते. यावेळी गाडी उलटण्यापूर्वी चालक गाडीतून बाहेर पडताना दिसतो, पण नंतर दोघाही दिसेनासे होतात. हा व्हिडिओ चंदीगडजवळील नयागाव येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या, गाडीतील दोघांच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती नाही किंवा व्हिडिओ नेमका कधी रेकॉर्ड केला गेला याबद्दल स्पष्टता नाही.

पाहा व्हिडीओ

दुदुमा धबधब्यावर रिल्स शूट करताना ओडिशाचा युट्यूबर वाहून गेला

दरम्यान, एका वेगळ्या पण अशाच घटनेत, ओडिशात कोरापूट जिल्ह्यातील दुदुमा धबधब्यात अशीच एक घटना घडली आहे.यामध्ये काही मित्र मिळून धबधब्यात गेले आहेत आणि रील शूट दरम्यान त्यांचा मित्र पाण्यात वाहून गेला आहे. रील बनवताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ओडिशाच्या बेरहामपूर येथील २२ वर्षीय युट्यूबर बेपत्ता झाला आहे. सागर टुडू असे या युट्यूबरचे नाव असून तो मित्राबरोबर स्थानिक पर्यटन स्थळांचे रील तयार करण्यासाठी डुडुमा धबधब्याजवळ गेला होता. प्रमेय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, धबधब्याच्या काठाजवळ ड्रोनने फुटेज कॅप्चर करत असताना अचानक पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे.