Pakistan Viral Video: वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही जगभरात अनेक देशांत महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुली फिरतायत.
सोशल मीडियावर अनेकदा या सगळ्या विकृत घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, ज्यामध्ये काही लोकांनी दोन तरुणींबरोबर असभ्य वर्तन केलं. इतकंच नाही तर त्यांना मारहाणही केली. नेमकं घडलं काय, जाणून घेऊ या…
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झालेल्या एका व्हिडीओमुळे पाकिस्तानमधील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन तरुणी गर्दी असलेल्या रस्त्यावरून चालत असतात आणि अचानक त्यांना घेरले जाते, तसंच त्यांना मारहाणही केली जाते.
तरुणींचा धक्कादायक व्हिडीओ (Two Women Harassed Video)
व्हायरल झालेल्या या व्हिडीओ फुटेजमध्ये एक भयानक दृश्य कैद झाले आहे, ज्यामध्ये मुली अस्वस्थ दिसत आहेत. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, त्यांना एका दुकानाजवळ कोपऱ्यात अडवले जाते आणि नंतर एक जमाव त्यांना वेगाने घेरतो. त्या दोघी तिथून पळून जाण्याचा प्रयत्नदेखील करतात, पण माणसं गर्दी करून त्यांच्याजवळ येतात आणि त्यांना मारहाण करतात.
दरम्यान, FPJच्या वृत्तानुसार, त्या दोघींनी हिजाब न घातल्यामुळे तसंच दोघी जीन्स आणि टॉपमध्ये असल्यामुळे त्यांना मारहाण केली असं म्हटलं जात आहे. या व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांच्या कोणत्याही अधिकृत प्रतिसादाची किंवा कारवाईची नोंद झालेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @Bala_mirr या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडिया युजर्सनी या घटनेवर संताप आणि तिरस्कार व्यक्त केला आहे.
एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तुम्ही विकृत आहात म्हणून एखाद्या महिलेला धोका निर्माण करण्याचे धाडस करता, हे थांबायला हवे.” तर दुसऱ्याने “अशा घटना घडल्या तर त्या मुलींना स्वतःच्या देशाचा द्वेष वाटू लागेल,” अशी कमेंट केली.