अफगाणिस्तान सरकारचं नेतृत्व करणारा तालिबानी नेता पाकिस्तानी?; समोर आला पासपोर्ट अन् राष्ट्रीय ओळखपत्र

सध्या अफगाणिस्तानमधील आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची झाली असून लवकरात लवकर सत्ता स्थापन करुन आर्थिक घडी बसवण्याचं आव्हान तालिबानसमोर आहे.

Taliban leader Mullah Baradar Pakistani passport
सध्या हे फोटो व्हायरल झालेत (फाइल फोटो सौजन्य रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार)

तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला बरादरच्या पाकिस्तानी पासपोर्टचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. तालिबान अफगाणिस्तानमध्ये मुल्ला बरादरच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर हा कथित पासपोर्ट व्हायरल झालाय. हा पासपोर्ट खरा आहे की खोटा यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. तरी बरादरकडे पाकिस्तानी पासपोर्ट असल्याचा दावा खरा असल्याचं काही वेबसाईट्सने जुन्या रिपोर्ट्सचा हवाला देत म्हटलं आहे.

नक्की वाचा >> पंजशीरही जिंकलं : “देश युद्धातून पूर्णपणे बाहेर पडला असून आता नागरिक शांततेत, स्वातंत्र्यामध्ये आणि…”; तालिबानचा दावा

अफगाणिस्तानमधील खासा प्रेसच्या एका जुन्या वृत्तामध्ये दावा करण्यात आलाय की बरादरकडे केवळ पाकिस्तानी पासपोर्ट नसून पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणारं राष्ट्रीय ओळखपत्रही आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा निर्देशालयाच्या एका माजी अधिकाऱ्याने ही कागदपत्र पाकिस्तानने मुल्ला बारदारला मोहम्मद आरिफ आगा या बनावट नावाने दिल्याचा दावा केलाय. ही कागदपत्र कथित स्वरुपामध्ये पाकिस्तानमधील कराची शहरामध्ये मुल्ला बरादरला ७ जुलै २०१४ रोजी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जेव्हा हे बनावट ओळखपत्र बरादरला देण्यात आलं तेव्हा २०१० मध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अटक झाल्यापासून पाकिस्तानमध्येच होता.

जुन्या अहवालामध्ये असं सुद्धा नमूद करण्यात आलं होतं की तालिबानने हा दावा फेटाळून लावला होता. मुल्ला बरादर आणि मोहम्मद आरिफ आगा या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असणारा पासपोर्ट बरादरचा नसल्याचा दावा तालिबानने केला होता. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या फोटोमधील व्यक्तीचा चेहरा हा बरादरच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणारा आहे. तालिबानचा आधीचा सर्वोच्च नेता मुल्ला अख्तर मंसूरकडे एक पाकिस्ताने पासपोर्ट होता जो २००६ साली त्याला ठार करण्यात आल्यानंतर तपास यंत्रणांच्या हाती लागला होता.

आता मुल्ला बरादरला तालिबानच्या सरकारला प्रमुख म्हणून पाहिलं जात आहे तर त्याच पार्श्वभूमीवर हा फोटो व्हायरल झालाय. पाकिस्तानकडून तालिबानला अनेकदा मदत करण्यात आल्याचे दावे यापूर्वीही करण्यात आलेत. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख फैज हमीद यांनी काबूल दौऱ्यादरम्यान तालिबानला पाकिस्तानच्या समर्थनासंदर्भात भाष्य केलं होतं. यावरुनच आता अनेक विश्लेषकांनी तालिबान म्हणजे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारी संघटना असल्याचा दावा केलाय.

नक्की वाचा >> तालिबानमधील तरुण पॉर्न वेबसाइट्सवरुन तयार करतायत Kill List; जाणून घ्या काय आहे प्रकरण

बरादर आहे तरी कोण?

तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला बरादर हा अफगाणिस्तानमधील सरकारचं नेतृत्व करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच केली जाणार आहे. तालिबानशीसंबंधित असणाऱ्या सुत्रांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. सध्या अफगाणिस्तानमधील आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची झाली असून लवकरात लवकर सत्ता स्थापन करुन आर्थिक घडी बसवण्याचं आव्हान तालिबानसमोर आहे. बरादर हा तालिबानच्या राजकीय कार्यालयाचं नेतृत्व करतो. बरादरने अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंचावरुन तालिबानची बाजू मांडली आहे.

नक्की वाचा >> तालिबानला युनायडेट नेशन्सकडून मोठा दिलासा

बरादरसोबत कोण?

बरादरबरोबरच मुल्ला मोहम्मद याकूबकडेही मुख्य जबाबदारी दिली जाणार आहे. मुल्ला मोहम्मद याकूब हा तालिबानचा सह-संस्थापक असणारा पण काही वर्षापूर्वीच मरण पावलेल्या मुल्ला ओमरचा मुलगा आहे. मोहम्मद अब्बास स्टानिकजईलाही सरकारमध्ये वरिष्ठ पद दिलं जाणार असल्याची माहिती समोर आलीय. “तालिबानचे सर्व वरिष्ठ नेते काबूलमध्ये दाखल झाले आहेत. नवीन सरकारची घोषणा करण्याच्या अंतिम टप्पातील चर्चा सुरु आहेत,” असं तालिबानच्या सुत्रांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

नक्की वाचा >> “…म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्यच”; शिवसेनेनं जावेद अख्तर यांना सुनावलं

कोणाला मिळणार संधी?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नवीन मंत्रीमंडळ बनवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. सर्व सहकारी गटांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी तालिबानला किमान दोन तीन दिवसांचा अवधी लागणार आहे. . तालिबानचे सांस्कृतिक आयोगाचे सदस्य बिलाल करीमीने संघटनेचा प्रमुख नेता हिबतुल्लाह अखुंदजादाच्या नेतृत्वाखाली यासंदर्भातील चर्चा होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नवीन सरकारमध्ये पवित्र आणि सुशिक्षित लोकांचा समावेश असे आणि मागील २० वर्षांपासून सरकारमध्ये असणाऱ्यांना संधी दिली जाणार नाही, अशी माहिती कतारमध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजईने दिलीय. विशेष म्हणजे सरकारमध्ये महिलांनाही स्थान दिलं जाईल असंही अब्बास स्टानिकजाईने स्पष्ट केलंय. सरकार हे संघटनेचा प्रमुख नेता हिबतुल्लाह अखुंदजादाच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे संकेत तालिबानने दिले होते. मात्र अखुंदजादा हा केवळ नामधार नेता असला तरी दैनंदिन कारभार मुल्ला बरादरकडे असणार आहे अशी माहिती समोर येतेय.

नक्की वाचा >> एक फोटो आणि नाव… जगाला एवढीच ओळख असणारा ‘तालिबान’चा म्होरक्या आणि त्याच्याबद्दलचं गूढ

दहशतवादी होणार नेते…

पाजव्होक या अफगाणिस्तानमधील वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार तालिबानने सखउल्लाहकडे कार्यवाहक शिक्षा प्रमुख. अब्दुल बाकीला उच्च शिक्षण कार्यवाहक प्रमुख, सदर इब्राहिमला कार्यवाहक गृहमंत्री, गुल आगाला वित्तमंत्री, मुल्ला शिरीनला काबूलचा राज्यपाल, हमदुल्ला नोमानीला काबूलचा महापौर आणि नजीबुल्लाहला गुप्तहेर संघटनेचा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली जाणार आहे. यापूर्वी तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदला संस्कृति आणि सूचना मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Social viral does taliban leader mullah baradar hold a pakistani passport scsg

ताज्या बातम्या