आजपर्यंत तुम्ही वर्गात शिकणारे विद्यार्थी पाहिले असतीलच यात शंका नाही, पण सध्या रीलच्या जमान्यात विद्यार्थी वर्गात शिकायचं सोडून कधी काय पराक्रम करतील हे सांगता येत नाही. कधी ते एखाद्या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करतात, तर कधी कोणाची नक्कल करतात, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच काही विद्यार्थ्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.
हो कारण या व्हिडीओतील मुलांनी लग्नाचे मजेशीर नाटक केलं आहे. या मुलांचा अभिनय लोकांना इतका आवडला आहे की हा व्हिडीओ आतापर्यंत ५.५ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलांचा अभिनय, लग्नाचे वातावरण आणि बॉलीवूड गाणी याचा भन्नाट संगम पाहायला मिळत आहे. व्हिडीओत, काही विद्यार्थी आपल्या मित्राला स्टेजवर घेऊन जाताना दिसत आहेत. जो नवरी बनला आहे. यानंतर ते त्या मित्राला खुर्चीवर चढायला नवरा बनलेला विद्यार्थी मदत करतो.
यावेळी वर्गातील इतर विद्यार्थी लग्नातील पाहुणे आणि नातेवाईकांची भूमिका हुबेहूब बजावताना दिसत आहेत. यावेळी ते नातेवाईकांप्रमाणे स्टेजवर जाऊन वधू-वरांना भेटवस्तू आणि आशीर्वादही देत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे लग्नाचे पूर्ण विधी पार पाडल्यानंतर सात फेरेदेखील घेतात. यावेळी वधू आपल्या कुटुंबीयांचा निरोप घेतानाही दिसत आहे.
मुलांच्या या मजेदार नाटकाचा व्हिडीओ @krmani43 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “लाखो व्ह्यूज आणि शेअर्सबद्दल धन्यवाद. आतापर्यंत या रीलला ४५ लाख लाईक्स, साडे पाच कोटींहून अधिक व्ह्यूज आणि ५२ हजार कमेंट्स मिळाल्या आहेत.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या शाळेतील दिवसांची आठवण झाली आहे, तर अनेकांनी हे सर्व शाळेत पण असते का? असे मजेशीर प्रश्न विचारले आहेत. तर काही युजर्संनी लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी मिश्कील कमेंट करत लिहिले आहे, “अभ्यास करा रे… अशा रील्सचा काही फायदा नाही.”