आयुष्य म्हणजे खेळ नाही. अनेक लोकांना आपल्या आणि इतरांच्या आयुष्याची पर्वा नसते त्यामुळेच हे लोक अत्यंत बेपर्वांने वागतात. हेच लोक स्टंटबाजी करणाच्या नादात स्वत:बरोबर इतरांचा जीव धोक्यात टाकतात. अनेकदा लोक भररस्त्यात स्टंटबाजी करताना दिसतात पण ज्यामुळे भयानक अपघात होऊ शकतो याची त्यांना कसली चिंताच नसते.अनेकदा वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करतात पण स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवाची देखील पर्वा करत नाही. असाच काहीसा प्रकार दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेस वेवर घडला आहे.

एक्सप्रेसे वे जिथे भरधाव वेगाने वाहनांची येजा सुरु असते त्याच रस्त्यावर एका व्यक्ती बाईकवर उभे राहून स्टंट करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले. व्हिडिओमध्ये, एक्सप्रेस वेवर वाहनांच्यामध्ये स्टंट करताना तो माणूस खाली पडला आणि त्याची बाईक दुसर्‍या वाहनालाही धडकली, असे त्यांनी सांगितले.

बाईकवर बसण्याचा प्रयत्न करताना तो त्याचा तोल जातो आणि तो थेट रस्त्यावर पडतो. तो माणूस पडल्यानंतरही, बाईक पुढे जात आहे आणि पुढे जाणाऱ्या कारवर जाऊन आदळते, असे पोलिसांनी सांगितले.

“व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू आहे. पोलिसांची सोशल मीडिया टीम व्हिडिओची चौकशी करत आहे. तरुणाची ओळख पटल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल,” असे गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ते संदीप कुमार म्हणाले.

असा अपघात घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे, भररस्त्यात स्टंटबाजी करणाऱ्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओतून हाच संदेश मिळतो की आपला जीव अत्यंत मोलाचा आहे त्यामुळे आपला जीव अशा पद्दतीने धोक्यात टाकू नये. तसेच रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे जेणेकरून स्वत:च्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माम होणार नाही.