Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहीत आहे की, आई-वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यांसमोर ठेवून काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात.आपल्यापैकी अनेकांचं एकच ध्येय असतं ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणं. कारण- आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे मुलांचं कर्तव्य असतं.
त्याशिवाय अनेक मुलंदेखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती अभ्यास करतानाच तिला कळतं की, ती पोलीस झाली आहे. हा भावनिक व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत नक्की पाणी येईल.
‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे या उक्तीप्रमाणे जिद्द व मेहनत असेल, तर कोणतेही काम साध्य होते. पोलीस किंवा सैन्यदलात भरती होण्यासाठी लाखो मुलं तयारी करतात. परंतु, अत्यंत कठीण परिश्रम करूनही त्यात मोजकेच यशस्वी होतात. मात्र, या तरुणीनं जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश जणू खेचून आणलंय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरात दोन तरुणी अभ्यास करताना दिसत आहेत, त्यावेळी त्यांचे सर घरी येतात आणि निकाल पाहिला का, असा प्रश्न विचारतात. यावेळी त्यापैकी एक जण, “नाही अजून. आता पाहेन”, असं उत्तर देते. त्यावर ते सर त्या तरुणीला पोलीस भरतीमध्ये तिची निवड झाली असून, ती दुसरी आल्याची बातमी देऊन तिचं कौतुक करतात. यावेळी या तरुणीला इतका आनंद होतो की, तिला अश्रू अनावर होतात. आपण केलेल्या मेहनतीचं अन् आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाचं सार्थक झाल्याचं समाधान त्या तरुणीच्या चेहऱ्यावर दिसतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “मराठी माणसाने मराठी माणसासोबत…” तुळशी बागेत लावलेली पुणेरी पाटी होतेय तुफान व्हायरल; प्रत्येकानं एकदा वाचा
हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत; तर अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत. आई-वडिलांनी कष्ट करावेत आणि पोरांनी त्याचं चीज करावं, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून, ते व्हिडीओतील मुलीचं तोंडभरून कौतुक करीत आहेत.