भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ नंतर क्रिकेटमधून विश्रांती घेत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कोहलीला आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. काही वेळ क्रिकेटपासून दूर राहूनही कोहली आता चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीसंदर्भात एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, विराट कोहलीच्या मुंबईतील वन 8 कम्युन या रेस्टॉरंटमध्ये तमिळनाडूतील एका व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला. त्याच्या कपड्यांमुळे हा प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. सोशल मीडियावर त्या तरुणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, लोक त्यावर विविध कमेंट्स करीत आहेत.
तमिळनाडूचा हा तरुण “वन 8′ रेस्टॉरंटबाहेर उभा राहून व्हिडीओ बनवत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी लुंगी घातली आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणतोय की, हे जुहू येथील विराट कोहलीचे रेस्टॉरंट आहे. JW मॅरियट जुहू येथे चेन इन केल्यानंतर मी वन 8 कम्युन रेस्टॉरंटमध्ये आलो. प्रसिद्ध ब्रॅण्डचे कपडे घातल्यानंतरही रेस्टॉरंट व्यवस्थापनाने मला प्रवेश दिला नाही आणि मी घातलेले कपडे त्यांच्या ड्रेस कोडमध्ये समाविष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
व्हिडीओमध्ये तो तरुण पुढे म्हणतो की, “मोठ्या निराशेने मी माझ्या हॉलेटमध्ये परत जात आहे. या प्रकरणी कारवाई होईल की नाही माहीत नाही. पण अशी प्रकरणे पुन्हा होणार नाहीत, अशी आशा करतो. मी योग्य असा तमीळ सांस्कृतिक पोशाख परिधान केला आहे. व्यवस्थापनाने संपूर्ण तमीळ समाजाचा आणि आमच्या संस्कृतीचा अपमान केला आहे.”
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, “ही व्यक्ती तमीळमधील फेमस सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ आतापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी आता किंग कोहलीला घेरत जोरदार ट्रोल करीत आहेत; तर अनेक लोक या रेस्टॉरंटला पाठिंबाही देत आहेत.