कोणत्याही आईसाठी आपले बाळ गमावणे यासारखे वाईट दुख काही असू शकत नाही. माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही दुख भोगावे लागते. अशाच एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलेशियामध्ये अलिकडेच घडलेल्या एका घटने रस्ता ओलांडणाऱ्या एका हत्तीचे पिल्लू ट्रकखाली चिरडले गेले. या घटनेमुळे दुखी हत्तीण त्याच ठिकाणी काही तास दुख व्यक्त करत उभी होती. ती तेथून हलण्यास तयार नव्हती. ही घटना ११ मे रोजी, मदर्स डे रोजी पेराकमधील गेरिक-जेली पूर्व-पश्चिम महामार्गावर घडली.
@jklamlam या इंस्टाग्राम हँडलने शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये हत्तीचे पिल्लू ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले, अपघातानंतर हत्तीण काही तास तेथेच पिल्लाजवळ उभी होती. पिल्लाला तेथे सोडून जाण्यास ती नकार देत आहे. भररस्त्यात हा प्रकार घडल्याने पहाट होताच परिसरात वाहनांची लांब रांग लागल्याचे दिसते. दरम्यान बचावकर्त्यांच्या हत्तीणीला हलवण्याचे प्रयत् करतात पण लेकराच्या मृत्यूमुळे दुखी झालेली हत्तीण त्याच्या जवळ ठामपणे उभी राहते.
व्हिडिओ शेअर करताना, हँडलने पोस्ट केले की, “ही दुर्घटना वाढत्या रस्त्यांच्या जाळ्यांमुळे वन्यजीवांना किती गंभीर धोका आहे हे दर्शवते. २०२० पासून, मलेशियातील रस्त्यांवर आठ हत्ती मारले गेले आहेत, ज्यात २०२५ मध्ये तीन हत्तींचा समावेश आहे. गेरिक-जेली महामार्ग रॉयल बेलम स्टेट पार्क आणि टेमेंगोर फॉरेस्ट सारख्या प्रमुख अधिवासांमधून जातो, ज्यामुळे ते प्राण्यांच्या रस्ता ओलांडण्याचे नेहमीचे ठिकाण आहे.”
“WWF-मलेशियासह संवर्धनवादी अधिक दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित कारवाई करण्यांची विनंती करत आहेत. जसे की, स्पीड बंप आणि वन्यजीव सुरक्षित रस्ता ओलंडण्याची सोय करणे, असेही त्यात पुढे म्हटले आहे.
या व्हिडिओला जवळपास ४ लाख व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे अनेक सोशल मीडिया वापरकर्ते संतापले आणि भावनिक झाले. “तिची अवस्था पाहून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. मला खूप वाईट वाटते की, तुला आणि तुझ्या बाळाला निराश केले, अशा महान प्राण्यांबरोबर ही पृथ्वीवर राहण्यास आपण पात्र नाही,” एका वापरकर्त्याने लिहिले.
“वाह त्यांनी हे केले! तुम्हाला रस्ता ओलांडताना हत्तीचे बाळ दिसणार नाही असे अजिबात शक्य नाही!! आणि त्यांनी या गरीब आईचे काय केले?” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली. “हे विनाशकारी आहे. या भव्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कारवाई केली पाहिजे,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.