CCTV Video Viral: लहान मुलांवर लक्ष ठेवलं नाही तर किती मोठा अपघात घडू शकतो, याची अनेक उदाहरणे याआधी पाहिली आहेत. विशेषतः अनेकदा लहान मुले अचानक गाडीसमोर येतात. चालकाच्या ब्लाईंड स्पॉटवर जर गाडीखाली कुणी आलं, तर अनर्थ घडतो. गुजरातच्या नवसारी येथे असाच एक विचित्र प्रकार घडला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

नेमका प्रकार काय?

नवसारी जिल्ह्यातील गंधवी तालुक्यातील एका गावात तीन वर्षांचा मुलगा अंगणात खेळत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात गेटमधून एक फॉर्च्यूनर गाडी आत येते. गाडी आत येत असताना लहान मुलगा खाली बसतो. त्यामुळे चालकाला कदाचित तो दिसत नाही. बघता बघता फॉर्च्यूनर गाडी मुलाच्या अंगावर जाते.

मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून घरातून एक महिला धावत बाहेर येताना दिसते. ही महिला मुलाची आई असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती महिला गाडीला हात दाखवून थांबण्यास सांगते आणि गाडीखाली वाकून मुलाला शोधू लागते. अखेर गाडीच्या डाव्या बाजूला जाऊन ती मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढते.

या थरारक प्रसंगाचा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. दैव बलवत्तर असल्यामुळे मुलाला कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे समोर येत आहे. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. जर महिलेने वेळेवर धाव घेऊन गाडी थांबवली नसती तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिकमध्ये घडला होता असाच अपघात

दरम्यान फेब्रुवारी महिन्यात नाशिकमध्ये अशाच प्रकारचा अपघात घडला होता. मात्र त्यात ५ वर्षांच्या ध्रुव राजपूत या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाथर्डी फाटा परिसरात एक्सप्रेस इन या हॉटेलमध्ये राजपूत परिवार आले होते. ध्रुव खेळत असताना अचानक गाडीखाली येतो. गाडीचे चाक अंगावरून गेल्यामुळे ध्रुवचा मृत्यू होतो.