सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा अशा घटना समोर येतात, ज्या ऐकून किंवा वाचून आपणाला धक्का बसतो. सध्या अशाच एका घटनेची माहिती समोर आली आहे. जी वाचून तुम्हाला धक्का बसू शकतो. हो कारण एका महिलेसोबत घडलेल्या रेस्टॉरंटमधील विचित्र घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या महिलेने एका रेस्टॉरंटविरोधात तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, तिने रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी सॅलड ऑर्डर केले होते, ज्यामध्ये तिला माणसाचे बोट आढळले, धक्कादायक बाब म्हणजे, सॅलडमध्ये असलेलं बोट तिने चघळल्यानंतर हा सर्व प्रकार तिच्या तेव्हा लक्षात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅलिसन कोजी असं या महिलेचं नाव आहे तर हे प्रकरण अमेरिकेतील कनेक्टिकट येथील आहे. घटनेतील महिलेने दावा केला आहे की, एप्रिल महिन्यात ती या रेस्टॉरंटमध्ये आली होती. यावेळी लॅलड चघळताना तिला माणसाच्या बोटाचा भाग खात असल्याचा भास झाला होता. जे नंतर खरोखर बोट असल्याचं उघडकीस आलं.
सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, तिने सांगितलं आहे की, रेस्टॉरंटच्या मॅनेजरने चुकून त्याचे बोट कापले होते, जो आदल्या दिवशी सॅलडसाठी भाजी बनवत होता. बोटाला कापताच मॅनेजर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेला. पण त्याचे तुटलेले बोट भाजीतच राहिले. त्यानंतर बोट असलेले सॅलड अनेक ग्राहकांना खायला दिले. यामध्ये अॅलिसनचाही समावेश होता.
अॅलिसनच्या सॅलडमध्ये बोटाचा एक भाग आढळताच तिला धक्का बसला आणि तिला पॅनिक अटॅक आला. तर सॅलड खाल्ल्यानंतर तिला मायग्रेन, मळमळ, चक्कर येणे आणि मान आणि खांदेदुखीच्या समस्या उद्भवायला सुरुवात झाली. अॅलिसनने रेस्टॉरंटकडे भरपाई मागितली असून वेस्टचेस्टर काउंटी आरोग्य विभागाने रेस्टॉरंटला ९०० डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. परंतु, याप्रकरणी रेस्टॉरंटकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.