Viral video: सोशल मीडियावर मुक्या प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा भटक्या प्राण्यांना शुल्लक कारणामुळे आपला जीव गमवावा लागतो. मात्र, काही प्राणीप्रेमी असे असतात जे संकटात सापडलेल्या मुक्या प्राण्यांना जीवदान देतात. प्रसंगी आपला जीव संकटात टाकून ते अशा प्राण्यांची मदत करत असतात. अनेक लोकांनी प्राण्यांना जीवदान दिल्याचे व्हिडीओ आपण याआधी सोशल मीडियावर पाहिले आहेत.
पण सध्या एका चिमुकल्याने तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजण्यासाठी असं काही केलं आहे, जे पाहून सर्वजण त्याचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. खरं तर आपणाला लहानपणापासून मुक्या प्राण्यांना मदत करा, तहानलेल्यांना पाणी पाजा असं शिकवलं जातं, पण ज्या वयात मोठी लोकं आपणाला अशा गोष्टी शिकवतात, त्या वयात हा चिमुकला तशी कृती करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा हापशी म्हणजेच बोअरवेलजवळ एका तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजण्यासाठी हॅन्डपंप मारताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की हापशीमधून पाणी काढण्यासाठी या चिमुकल्याला खूप ताकद लावावी लागत आहे. कारण त्याच्या ताकदीपेक्षा जास्त त्या हॅन्डपंपाचं वजन असल्याचं दिसत आहे. परंतु तो कुत्र्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न मात्र मनापासून करताना दिसत आहे.
या चिमुकल्याच्या माणुसकीचा व्हिडीओ @susantananda3 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे, “माणुसकी निभावण्यासाठी केवळ वयाने मोठं असून चालत नाही तर त्यालाठी मनदेखील मोठं असावं लागतं.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी या मुलाचं खूप कौतुक करत आहेत. तर अनेकांनी या मुलावर घरच्यांनी चांगले संस्कार केल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने “त्याला कळलं ते आपल्याला कधी कळणारं” असं म्हटलं आहे.