इतरांना वाहतुकीच्या नियमाचे पालन करायला सांगणारे पोलिसच अनेकदा ते नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. या सबंधित अनेक बातम्या आपण वाचत असतो, ज्यामध्ये पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केलेलं असतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन पोलीस हेल्मेटशिवाय बाईक चालवताना दिसत आहेत. पण व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे, हेल्मेटशिवाय बाईक चालविणाऱ्या पोलिसांचा पाठलाग करत दोन मुलींनी त्यांना ‘हेल्मेट का घातलं नाही’ असा जाब विचारला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मुली स्कूटीवरुन पोलिसांना हेल्मेट न घालता गाडी का चालवत आहात? असा प्रश्न विचारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण गाझियाबादमधील आहे. दोन मुलींनी पोलिसांना विना हेल्मेट दुचाकीवरून जात असल्याचे पाहताच मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि पोलिसांना जोरजोरोत तुमचं हेल्मेट कुठे आहे, असा प्रश्न विचारला. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. महत्वाची बाब म्हणजे व्हिडीओ व्हायरल होताच गाझियाबाद पोलिसांनी ट्रॅफिक हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली आहे. पोलिसांवर कारवाई झाल्याचं पाहून नेटकऱ्यांनी यूपी पोलिसांचं कौतुक केलं आहे.
१ मिनिट २८ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये दोन पोलिस मोटारसायकलवरून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर यावेळी त्या दोघांनीही हेल्मेट घातलेलं नाही. यावेळी स्कूटीवरून जात असलेल्या मुलींनी, तुमचे हेल्मेट कुठे आहे? असं विचारताच पोलीस बाईकचा वेग वाढवतात. पण मुली त्यांचा पाठलाग करणं थांबवत नाहीत, बराच वेळ मुलींनी या पोलिसांचा पाठलाग केल्याने नेटकरी मुलींच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.
@ImranTG1 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “गाझियाबादमध्ये मुलींनी पोलिसांना पळवले, पोलिस धावत राहिले, त्यांचा संवाद ऐकत राहा.” असं लिहिलं आहे. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे, “या मुली खूप धाडसी आहेत, त्यांनी पोलिसांनाच धडा शिकवला.” तर आणखी एकाने, पोलिसांनीदेखील नियमाचं पालन करायलाच हवं, असं लिहिलं आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तालय गाझियाबादच्या ट्विटर हँडलवरून हेल्मेट न घातलेल्या पोलिसांवर कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे.