Women Demands Bus Conductor To Remove Cap: एका महिला प्रवाशाने बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) बसच्या कंडक्टरने ‘स्कल कॅप’ म्हणजेच मुस्लिम घालतात तशी टोपी घालण्यावरून आक्षेप घेतल्याचे समजत आहे. यावरून वाद घातल्यावर महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांना या घटनेचा तपास करावा यासाठी नेटकऱ्यांनी सुद्धा जोरदार मागणी सुरु केली आहे. पण नेमका हा प्रकार काय होता व व्हिडिओमध्ये महिला नेमकं काय सांगतेय हे जाणून घेऊया..

व्हिडिओ शूट करणार्‍या महिलेने मुस्लिम समुदायातील कंडक्टरला लक्ष्य केल्यामुळे टीका होत आहे. बंगळुरू शहर पोलिसांनी या घटनेबाबत व्हायरल झालेल्या ट्विटला उत्तर दिले आहे. अज्ञात महिलेने शूट केलेल्या दीड मिनिटांच्या क्लिपमध्ये ती कंडक्टरला तुम्ही गणवेशात असताना ‘स्कल कॅप’ घालू शकता का असे विचारताना दिसते. कंडक्टर उत्तर देतो की हो, यावरून कधी कोणी आक्षेप घेतला नाही त्यामुळे कदाचित तो घालू शकतो.

“तुम्ही घरी तुमचा धर्म आचरणात आणा. गणवेशात असताना तुम्ही स्कल कॅप घालू नये,” असे ही स्त्री म्हणते. त्यावर कंडक्टर उत्तर देतो, “मॅडम, मी अनेक वर्षांपासून ही टोपी घालत आलोय.” हे संभाषण एवढ्यावरच थांबत नाही तर सदर महिला सातत्याने कंडक्टरला तुम्हाला ही टोपी घालण्याची परवानगी कोणी दिली असे विचारत राहते. त्यानंतर कंडक्टर तिला अधिकार्‍यांशी बोला असे थेट उत्तर देतो.

व्हिडिओच्या शेवटपर्यंत, ती महिला कंडक्टरने आपली टोपी काढलीच पाहिजे, असा आग्रह धरून बसते. “तुम्ही ती मशिदीत किंवा घरात घातली तर तिला हरकत नाही पण कामावर असताना टोपी घालणे चुकीचे आहे”, असेही ती बजावत राहते. शेवटी हा बस कंडक्टर आपली टोपी काढताना दिसत आहे.

हे ही वाचा<< लोकलमध्ये असं भांडण कधीच पाहिलं नसेल! बायकांनी चप्पला, बुक्क्यांनी हाणामारी करताना लहानग्यालाही…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी कंडक्टरला टार्गेट केल्याबद्दल महिलेवर टीका केली आहे. तुम्ही टिकली लावलेल्या किंवा पगडी घातलेल्या लोकांशी असेच वागाल का. पोलिस स्टेशनमध्ये ‘आयुध पूजा उत्सव’ झाला होता ज्यात पोलिस कर्मचारी भगवे स्कार्फ घालून दिसले होते तेव्हा तुम्हाला आक्षेप घेता आला नाही का? असेही प्रश्न कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी महिलेला विचारले आहे.