Mumbai Sand Strom Viral Video: मुंबईमध्ये १३ मे २०२४ ला अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांनी मुंबईकरांची दाणदाण उडवली होती. टीचभर पाऊस आणि ढीगभर धुळीने मुंबईकरांची काय करू आणि कुठे जाऊ अशी स्थिती केली होती म्हणता येईल. एकीकडे भीषण दुर्घटना, दुसरीकडे रेल्वे सेवा ठप्प होणं आणि शक्य होईल त्या सर्व पद्धतींनी निसर्गाने काल मुंबईकरांना चकित केलं होतं. तुम्ही सुद्धा मुंबईत राहात असाल तर हा अनुभव स्वतः घेतला असेलच आणि जर तुम्ही मुंबईकर नसाल तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओजमधून तुम्हाला ही भीषण स्थिती पाहायला मिळाली असेल. मुंबईतच नव्हे तर ठाणे, कल्याण- डोंबिवली, पालघर पासून ते अगदी बदलापूर पर्यंत काल प्रचंड मोठं धुळीचं वादळ घोंघावत होतं. या वादळाची एक झलक सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील दृश्य पाहून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

आदेश राऊत या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. व्हिडीओवर १३ मे २०२४ अशी तारीख सुद्धा दिसतेय. मुंबईतील एका मैदानालगतच्या रहिवाशी इमारतीमधूनच हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. घराच्या खिडकीतून एक कुटुंब आपल्या घराखालील मैदानात धुळीचं चक्रीवादळ तयार होताना पाहत असल्याचं तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसेल. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मैदानातील लाल माती गोल गोल फिरून वर उडू लागते. हळूहळू चक्रीवादळासारखा वेग ही उडणारी धूळ माती धारण करते. हे बघताना साहजिकच आपल्याही मनात जी उत्सुकता असेल तीच हा व्हिडीओ शूट करणाऱ्याच्या तोंडून ऐकायला मिळते. खाली मैदानात अन्य लहान मुलं आपला जीव मुठीत धरून पळताना सुद्धा दिसत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासूनच प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे शूट करणाऱ्याची उत्सुकता पाहून नेटकरी लोटपोट झाले आहेत. काहींनी तर उडणाऱ्या धुळीचे प्रमाण पाहता नक्की काल मुंबईत जेवढी धूळ आली ती सगळी इथूनच आली असावी असा अंदाजही अनेकांनी बांधला आहे. तर काहींनी मस्करीत, ” भावा तू मोरापेक्षा जास्त आनंदी दिसतोय”, “भावा तू वादळाला गाणी लावून स्वतःचा वेगळाच माहोल तयार केलायस असं म्हणत मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

काहींनी तर ही मोदी सरकारच्या विजयाची सुरुवात आहे असं म्हणत आपली वेगळीच क्रिएटिव्हिटी या कमेंट बॉक्समध्ये दाखवली आहे. तर काहींनी आता गणपती येणार असल्याने निसर्ग स्वच्छतेला सुरुवात करतोय असं म्हणत अगदी भोळ्या भाबड्या कमेंट्स सुद्धा केल्या आहेत.

हे ही वाचा<< घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगविषयी BMC चा मोठा खुलासा; परवानगी कुणी दिली, खरा दोष कुणाचा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिल्यास, मुंबईत सोमवारी धडकलेलं वादळ हे अनेक कुटुंबासाठी काळाचा हल्ला ठरलं. घाटकोपरमधील पंतनगर भागात या वादळी वाऱ्यांमुळे कोसळून पडलेल्या मोठ्या होर्डिंगमुळे तब्बल १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर अजूनही उपचार चालू आहेत.