आपल्याला सोशल मीडियावर दररोज काहीतरी विचित्र आणि वेगवेगळे पदार्थ एकत्र करून बनवल्याचे, खाल्ल्याचे दिसत असतात. त्यामध्ये कधी मोमोचा समावेश असतो, तर कधी मॅगी, वडापाव आणि डोसा यांसारखे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी काही पदार्थ दिसायला जरी चांगले वाटत असले तरीही बऱ्याचदा अशा विचित्र पदार्थांवर नेटकरी फारसे खुश होत नाहीत. सध्या सर्व सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओचे काहीसे असेच झाले आहे. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने पाणीपुरीच्या नावाखाली जो काही भयंकर प्रकार बनवला आहे, त्याने सर्व पाणीपुरीप्रेमींनी कमेंट्समध्ये एकच दंगा घातलेला आपल्याला पाहायला मिळेल. पण, या पाणीपुरीसोबत नेमकं केलं तरी काय आहे हे पाहा.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मिक्सरच्या भांड्यात पाणीपुरीच्या पुऱ्या, बारीक चिरलेला कांदा, पुरीमध्ये भरले जाणारे बटाट्याचे मिश्रण आणि तिखट पाणी असे सर्व पदार्थ टाकून घेऊन मिक्सरला फिरवून घेतो. यानंतर ती व्यक्ती पाणीपुरीच्या या वाटलेल्या मिश्रणात, ‘माझा’ हे शीतपेय आणि चॉकलेट सिरप घालून घेतो. आता तयार केलेले हे पाणीपुरीचे सरबत चक्क एका ग्लासमध्ये घालून पिण्यासाठी देत आहे.
या व्हिडीओचा अनेक नेटकऱ्यांना संताप आला असून त्यांनी या भयंकर पदार्थावर नापसंतीच्या प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

हा व्हिडीओ @food_badger_official या अकाउंटने आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मिडिया हँडलवरून शेअर केला आहे. आता त्यावर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहा.

हेही वाचा : Video : काय! ‘चीज’ घालून बनवले संत्र्याचे सरबत; ‘या’ Viral व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहा. . .

“हा व्हिडीओ पाच सेकंदांच्या वर मी पाहूच शकत नाही. माझ्या सर्वात आवडत्या पदार्थासोबत हे जे काही केले आहे, त्याला कधीही माफी मिळणार नाही”, असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्याने, ” वाह! आता तुम्ही यांच्या लहान लहान गोळ्या तयार करून कुठेही घेऊन जाऊ शकता आणि मनात आलं की पाणीपुरी खाऊ शकता”, असे म्हटले आहे. या व्हिडीओवर तिसऱ्या व्यक्तीने, “सगळ्याच गोष्टी, सगळ्यांना दाखवायला हव्या असं नाही. हा पदार्थदेखील असाच आहे. हा व्हिडीओ सर्वांना दाखवला नसता तरीही चालले असते”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “या पाणीपुरीला या वर्षीचा सर्वात बेकार पदार्थ म्हणून घोषित करायला हवे”, असे शेवटी चौथ्या व्यक्तीने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला आतापर्यंत चार लाख व्ह्यूज मिळाले असून, प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स आलेल्या आहेत.
विचित्र पाणीपुरीचे अनेक प्रकार याआधी सोशल मीडियावर येऊन गेले आहेत. यामध्ये चॉकलेट पाणीपुरी, अंड पाणीपुरी, फायर पाणीपुरी, कढी पाणीपुरी आणि पाणीपुरी पिझ्झा इत्यादी पदार्थांचा समावेश झाला असून, अर्थातच पाणीपुरीप्रेमी आणि नेटकऱ्यांनी त्याला आपली नापसंती दर्शवली होती.