अनेकांकडे सध्या लग्न, साखरपुडे किंवा अजून कुठल्या ना कुठल्या समारंभाची लगबग सुरू आहे. अशा समारंभांमध्ये सर्वांच्या तोंडी कुतूहलाचा प्रश्न असतो आणि तो म्हणजे, “मग आजच्या कार्यक्रमाचा मेन्यू काय?” कार्यक्रम लहान असू दे किंवा भव्य खाण्यापिण्याचा बेत हा भन्नाट असलाच पाहिजे, असे सर्वांचे मत असते. त्यामुळे सध्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला चाट काउंटर, गोडाचे विविध पदार्थ, छोले भटुरे, पंजाबी पदार्थ, नूडल्स, आइस्क्रीम असे एकापेक्षा एक पदार्थ पाहायला मिळतात.
अशाच एका बुफेमध्ये बनविल्या जाणाऱ्या नूडल्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झालेला आहे. परंतु, ते बनविणारा माणूस, त्याची पद्धत आणि एकंदरीत तेथील अस्वच्छता पाहून नेटकरी खूपच हैराण आणि नाराज झाल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून समजते. मात्र, नेटकऱ्यांचे नाराज व्हायचे नेमके कारण काय ते आपण पाहू. म्हणजेच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नूडल्स नेमक्या कशा बनविल्या जात आहेत ते जाणून घेऊ.
हेही वाचा : बापरे! नाकात ६८ काड्या घालून केला Guinness World Record! व्हायरल होणारा फोटो पाहा…
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये लग्नात जेवणाचे जसे काउंटर असते, तसे काउंटर पाहायला मिळत आहेत. त्यात एक निळ्या रंगाचा शर्ट घातलेली आणि मानेपर्यंत लांब केस असणारी एक मध्यम वयाचा माणूस दिसत आहे. तो त्याच्यासमोर असणाऱ्या एका काळ्याकुट्ट कढईमध्ये नूडल्स बनविते आहे. मात्र, तो एका हातामध्ये मोठा चमचा घेऊन, तोच हात कोपरापर्यंत कढईमध्ये घालून नूडल्स ढवळत आहे. इतकेच नाही, तर त्या ढवळलेल्या नूडल्स पुन्हा एकदा दुसऱ्या हाताने चिवडून मोकळ्या करतो. त्या माणसाचे दोन्ही हात कोपरांपर्यंत नूडल्स आणि तेलाने बरबटलेले असल्याचे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या किळसवाण्या प्रकाराला, जमिनीवरील पसाऱ्याची आणि अस्वच्छपणाची जोड आहेच. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर mh_official_33 नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नूडल्स बनविण्याची अशी पद्धत पाहून नेटकरी नेमके काय म्हणाले आहेत ते पाहू.
हेही वाचा : भाजी चिरण्याची निन्जा टेक्निक; मिनिटांत केले शंभरेक टोमॅटो बारीक! पाहा Video
एकाने, “आजपासून लग्नातले जेवण अजिबात जेवणार नाही,” असे म्हटले आहे. “नूडल्समध्ये आंघोळ करून झाली. आता त्यानं तोंडपण धुऊन घ्यायचं ना,” असे दुसऱ्याने म्हटले आहे. तिसऱ्याने, “बापरे! पिवळ्या रंगाचे नूडल्स?” असे व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या नूडल्सच्या रंगावरून लिहिले आहे. “दादा, जरा ते हाताला लागलेले नूडल्पपण ताटात वाढा ना…” असे चौथ्याने मार्मिकपणे लिहिले आहे.
सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत तीन मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओला ४२.५K इतके लाइक्स मिळाले आहेत.