Thane Viral Video: तुम्ही ठाण्यात ऑटो रिक्षाने प्रवास करत असाल तर सोनसाखळी चोरांपासून सावध राहा. तुमच्या मालकीची कार असेल तर अशा घटनांची नोंद करण्यासाठी कृपया डॅश कॅम खरेदी करा. सिटी कारमध्ये डॅश कॅम ही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अशा कॅप्शनसह एक पोस्ट सध्या ऑनलाईन तुफान व्हायरल होत आहे. रिक्षाने प्रवास करताना अलीकडेच प्रवाशाच्या गळ्यातून साखळी खेचून नेल्याच्या घटनेचा संदर्भ व पुरावा या पोस्टमध्ये देण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय चला जाणून घेऊया..

@QueenofThane द्वारे X वर शेअर केलेल्या धक्कादायक व्हिडीओमध्ये दुचाकीवरून जाणारे दोघे ऑटो-रिक्षा मधील प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना दिसत आहेत. X वापरकर्त्याचा दावा आहे की ही घटना ५ मे च्या रात्री ठाणे जिल्ह्यातील कापूरबावडी, घोडबंदर रोड येथे घडली होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, प्रवाशांची आणि दरोडा टाकणाऱ्या तरुणांची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणी काही कारवाई झाली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की या दोघांनी वेगात दुचाकी चालवली आणि चतुराईने ऑटो-रिक्षाजवळ पोहोचले. काही सेकंदात त्यांनी साखळी हिसकावली आणि चपळाईने पळ काढला. आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना एका गजबजलेल्या रस्त्यावर घडली आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या X वापरकर्त्याने सांगितल्यानुसार, ही घटना त्याच रस्त्यावर चालत असलेल्या कारच्या डॅश कॅमेऱ्यावर रेकॉर्ड झाली होती.

Video: ठाण्यात रिक्षातून प्रवास करताना राहा सावध!

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात सोनसाखळी चोरीची ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी, २७ फेब्रुवारीला एका ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी हिसकावून घेणाऱ्या तिघांना पोलिसांनी घटनेनंतर २४ तासातच अटक केली होती. या व्यक्तीशी एका क्षुल्लक मुद्द्यावरून चोरांचे भांडण झाले होते. या तिघांना विरार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने भिवंडी येथून अटक केली. आरोपींमध्ये टोळीचा सराईत अजगर खान उर्फ ​​अज्जू (४३) ज्याच्यावर भिवंडी, वालीव आणि विरारसह पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यासह मिराज अहमद अन्सारी (३३) आणि जमाल अन्सारी (३८) या दोघांचा समावेश आहे. हे तिघे भिवंडी येथील रहिवाशी आहेत.

यापूर्वी २०२३ च्या ऑक्टोबरमध्ये अशा सलग दोन घटना ठाणे व कल्याण मध्ये रिक्षाच्या प्रवासात घडल्या होत्या. ठाण्यात रिक्षाचालकाच्या गळ्यातून चोरांनी सोनसाखळी खेचून नेली होती. तर कल्याणमध्ये रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरांनी नेले होते.